'धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं विधान, म्हणाले 'हा विषय...'

Namdev Shastri on Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे. यादरम्यान नामदेव शास्त्री यांनी आता धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 31, 2025, 03:50 PM IST
'धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं विधान, म्हणाले 'हा विषय...' title=

Namdev Shastri on Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही, भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत. धनंजय मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा दावा करत त्यांनी त्याची पाठराखण केली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे. यादरम्यान नामदेव शास्त्री यांनी आता पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. 

नामदेव महाराज शास्त्री पत्रकार परिषदेत म्हणाले की, "धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होणं संप्रदायाचं नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेतली नाही?". 

"धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या 53 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे. त्यांची पार्श्वभूमी ती नाही. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाहीत. त्यांनी किती सोसावं?," अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

"मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलत आहे. धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे मी 100 टक्के ठामपणे सांगू शकतो. गड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. पक्षाच्या नेत्यांनाही याची जाणीव आहे.  हा विषय किती ताणायचा हे आता ज्याचं त्याने ठरवावं," असंही ते म्हणाले.