महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार; प्रसुतीनंतर डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय काढले

Mumbai News Today: केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला.  परवानगीशिवाय गर्भाशय काढल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.   

वनिता कांबळे | Updated: Feb 14, 2025, 11:40 AM IST
महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार; प्रसुतीनंतर डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय काढले

Mumbai News Today: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालय कायमच वादग्रस्त चर्चेत असते. आता पुन्हा एकदा डोंबिवलीतील पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात एका 26 वर्षीय गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. कुटुंबाचा आरोप आहे की, डॉक्टरांनी त्यांच्या परवानगीशिवाय ऑपरेशन करून महिलेला गंभीर परिस्थितीत ढकलले आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांनी या आरोपांना फेटाळून लावत महिलेचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले आहे.

डोंबिवलीतील अविनाश सरोदे यांच्या 26 वर्षीय पत्नी सुवर्णा सरोडे यांना 11 तारखेला डिलिव्हरीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 तारखेला त्यांना प्रसूतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, डिलिव्हरीनंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली.डॉक्टरांनी त्यानंतर तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तिचा गर्भाशय काढण्यात आला, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 
डॉक्टरांच्या मते, हा निर्णय तिचा जीव वाचवण्यासाठी घेण्यात आला. मात्र, कुटुंबीयांचा आरोप आहे की, ही प्रक्रिया करण्यासाठी त्यांची परवानगी घेतली नाही आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुवर्णाचा मृत्यू झाला.या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. जवळपास तासभर रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण राहिले. 

अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, रक्तस्त्राव अत्यंत वाढल्याने सुवर्णाला वाचवण्यासाठी गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तिचे प्राण वाचवण्यात अपयश आले. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आरोप निराधार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले मात्र कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.