UP Mahakumbh Women Bath Video: उत्तर प्रदेशात महाकुंभमध्ये सहभागी झालेल्या महिलांचे आंघोळ करतानाचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूट केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर हे व्हिडीओ विकले जात आहेत. पोलिसांनी हे व्हिडीओ विकणारे आणि विकत घेणारे अशा दोघांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. तसंच आतापर्यंत कारवाई करण्यासाठी अशा 103 सोशल मीडिया अकाऊंट्सची ओळख पटवण्यात आल्याचंही सांगितलं आहे.
उत्तर प्रदेश सोशल मीडिया मॉनिटरिंग टीमने काही प्लॅटफॉर्म्सवर जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यातील महिलांचे स्नान आणि कपडे बदलण्याचे व्हिडिओ अपलोड केले जात असल्याचं आढळलं आहे. यामुळे त्यांच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन होत आहे, असं पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा हिंदू भक्तांना प्रयागराज शहरात आकर्षित करतो. सहा आठवड्यांचा कुंभमेळा हा हिंदू धार्मिक दिनदर्शिकेतील सर्वात मोठा टप्पा आहे. गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत सुमारे 50 कोटी भाविकांनी भेट दिली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कुंभमेळ्यादरम्यान स्नान केल्याने पापांचे शुद्धीकरण होते असा हिंदूंचा विश्वास आहे.
"आम्हाला काही सोशल मीडिया प्रोफाईल्स आणि ग्रुप्स तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे, जिथे बेकायदेशीर गोष्टी केल्या जात आहेत. आम्ही त्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच या गुन्ह्यात सहभागी सर्वांची ओळख पटवली जात आहे. हे फौजदारी गुन्हे आहेत. हा आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे," असं महाकुंभ उपमहानिरीक्षक (डीआयजी) वैभव कृष्णा यांनी सांगितलं आहे.
"जे असे व्हिडीओ विकत आहेत आणि जे खरेदी करत आहे त्या सर्वांना अटक केली जाईल. आमची सोशल मीडिया टीम सतत लक्ष ठेवून आहे. असा कंटेंट अपलोड करणाऱ्या सोशल मीडिया प्रोफाईल्सविरोधातही कडक कारवाई केली जाईल," असंही त्यांनी सांगितलं आहे.
आतापर्यंत अशा किती ग्रुप्सची किंवा लोकांची ओळख पटली आहे असं विचारलं असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही टेलिग्राम आणि इंस्टाग्राम प्रोफाइलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
"आम्ही काल एफआयआर दाखल केला आहे. टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर काही प्रोफाइल आहेत ज्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आताही आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवत आहोत. आम्ही त्यांची ओळख पटवत असून, त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करत आहोत. आतापर्यंत 103 सोशल मीडिया प्रोफाइल्सची ओळख पटवण्यात आली आहे. ज्यामध्ये भिती पसरवणारे प्रोफाइल आहेत आणि महाकुंभातील महिलांचे खासगी व्हिडिओ पोस्ट करणारे प्रोफाइल आहेत," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
"एकूण 26 सोशल मीडिया हँडल आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल," असा इशारा त्यांनी दिला आहे.