Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. महाराष्ट्रात वाढल्या उन्हाच्या झळा.... पाहा सविस्तर हवामान वृत्त   

सायली पाटील | Updated: Feb 18, 2025, 08:22 AM IST
Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी
Maharashtra Weather news Mumbai to experiance massive heatwave northern states will experiance temprature drop down

Maharashtra Weather News : फेब्रुवारीचा महिना सुरु झाल्यानंतर देशभरातील हवामानत मोठे बदल होत असून, महाराष्ट्रासह दक्षिण भारतामध्ये हवामानात सर्वाधिक बदल होत असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला आहे. पहाटेच्या वेळी निवडक जिल्ह्यांमध्ये जाणवणारा गारठा वगळता उर्वरित राज्यांमध्ये उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टी क्षेत्र, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. 

राज्यात उन्हाच्या झळा वाढत असून, मुंबईत तापमानाचा आकडा 35 अंशांवर पोहोचलं असून, राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये करण्यात आली आहे. इथं उच्चांकी आकडा 37.4 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत राज्यात पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

हेसुद्धा वाचा : वीज ग्राहकांना MSEB चा मोठा दिलासा! TOD मिटर्स बसवणार; आता अगदी काही मिनिटांमध्ये...

 

राज्यात निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात 10 ते 22 अंशांचा फरक पडताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात तापमानवाढ अपेक्षित असून, उष्मा आणखी वाढणार असल्यामुळं नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात चढ-उतार होत असून, या बदलांमुळे व्हायरल इन्फेक्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर इन्फ्लूएन्झा, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. 

देशात पावसासह बर्फवृष्टीचा इशारा 

पश्चिमी झंझावातामुळं देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांवर पावसाचं सावट पाहायला मिळणार आहे. राजस्थानमध्ये याचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळणार आहे. तिथं उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.