देवाभाऊ रिटर्न्स! सत्ता गेल्यानंतर फडणवीसांचे 2024मध्ये जोरदार कमबॅक

Devendra Fadanvis Comeback: देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा प्रवास तेवढा सोपा नव्हता.

Pravin Dabholkar | Updated: Dec 4, 2024, 08:34 PM IST
देवाभाऊ रिटर्न्स! सत्ता गेल्यानंतर फडणवीसांचे 2024मध्ये जोरदार कमबॅक title=
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis Comeback: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतायत. मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारणाऱ्या फडणवीसांसाठी हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. 2019ला स्पष्ट बहुमत मिळून हातून सत्ता गेल्यानंतर फडणवीसांनी 2024मध्ये जोरदार कमबॅक केलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ म्हणून देवेद्र फडणवीसींकडं पाहाता येईल.महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा आश्वासक चेहरा अशी देवेंद्र फडणवीसांनी आपली ओळख तयार केली. फडणवीसांचं राजकारण हे सहकारच्या चाकोरीबाहेरचं.पण तरीही फडणवीसांच्या राजकारणाला जनतेती राजमान्यता मिळालीय. पण फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा प्रवास तेवढा सोपा नव्हता.

2014च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. 2014 ते 2019च्या काळात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले.  या काळात त्यांनी डेव्हलपमेंट पॉलिटिक्स म्हणजे विकासाचं राजकारण त्यांनी केलं. या काळात त्यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि पक्षांतर्गत विरोधक असलेल्या एकनाथ खडसेंचाही यशस्वीपणं सामना केला. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाचवर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावे नोंदवला गेला.

प्रतिकूल परिस्थितीत फडणवीसांनी हार मानली नव्हती.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी त्यांनी गुप्तपणे संधान साधलं. 23 नोव्हेंबर 2019च्या भल्या पहाटे कुणालाही कुणकुण लागू न देता अजित पवारांसोबत त्यांनी सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण आकड्यांचं गणित अजित पवार जमवू शकले नाहीत. त्यामुळं अवघ्या काही तासांत त्यांनी माघार घेतली. अजितदादांच्या माघारीमुळं फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून पदभार स्वीकारला.फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून चमकदार कामगिरी केली. अनिल देशमुखांवर शंभर कोटी रुपये वसुलीचे झालेले आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला फडणवीस यांनीच वाचा फोडली. फडणवीसांनी विधिमंडळात भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला.

एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदारांना घेऊन सूरत गाठली. सुरुवातीला पंधरा ते सतरा आमदार एकनाथ शिंदेंसोबत होते. नंतर ही संख्या वाढत जवळपास 40पर्यंत गेली. सूरतचा मुक्काम हलवून शिंदे गुवाहटीला गेले. एकनाथ शिंदेंना युतीकडं आणण्यात फडणवीसांनी मोठी भूमिका बजावली. तब्बल 40 सत्ताधारी आमदार फुटल्यानं उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. 

एकनाथ शिंदेंचं बंड वाटत असलं तरी सगळी नैपथ्यरचना फडणवीसांची होती. साहजिकच मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार होती हे शेवटपर्यंत सगळ्यांना वाटत होतं. पण भाजपश्रेष्ठींच्या मनात मात्र वेगळंच काही होतं. आयत्यावेळी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. फडणवीसांनी सरकारबाहेर राहण्याची घोषणा केली. पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं.

फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये होते तरीही त्यांना खिंडीत गाठण्याचे खूप प्रयत्न झाले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणाऱ्या जरांगेंच्या निशाण्यावर फडणवीस कायम राहिले. मराठा आरक्षणाच्या मुदद्यावरुन जरांगेंनी कायम टीका केली. पण फडणवीसांनी त्यांचा यशस्वीपणे सामना केला. 

महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी त्या क्षणापासून विधानसभा निवडणुकीची तयारी केली. लोकसभा निवडणुकीत काही गणितं चुकली. पण विधानसभेत लोकसभेच्या चुका त्यांनी टाळल्या.भाजपचे जे नाराज होते त्यांची समजूत काढली. काहींना मित्रपक्षांमधून उमेदवारी दिली. या मेहनतीचं फळही निवडणुकीत दिसलं. भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आले.

महिला मतदारांचा लाडका देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्रिपदावर आरुढ होतोय. फडणवीसांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. पण संकटं आल्यावर न डगमगता ते काम करत राहिले. फडणवीसांचं गेल्या 10 वर्षातील राजकारण पाहता महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर फडणवीस नावाचा तारा चमकत राहणार यात शंका नाही.