EXCLUSIVE: धनंजय मुंडेंना पाठिंबा द्यावासा का वाटला? नामदेव शास्त्रींनी केला खुलासा

Namdev Shatri Exclusive Interview: भगवानगड भक्कमपणे धनंजयच्या पाठीशी आहे. माझ्यासह भगवानगडाची ही भूमिका आहे असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 31, 2025, 09:42 PM IST
EXCLUSIVE: धनंजय मुंडेंना पाठिंबा द्यावासा का वाटला? नामदेव शास्त्रींनी केला खुलासा title=

Namdev Shatri Exclusive Interview: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे, दरम्यान वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यादरम्यान आज धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शवला. त्यांची मीडिया ट्रायल होणं योग्य नाही असंही नामदेव शास्त्री म्हणाले आहेत. दरम्यान अशी भूमिका घेतली हे महंत नामदेव शास्त्री यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं आहे. 

धनंजय मुंडे यांना पाठिंबा द्यावा असं का वाटलं? यावर ते म्हणाले की, "हत्येचं समर्थन भगवानगड करत नाही. धनंजय यांचं समर्थन करणं हा माझा वैयक्तिक विषय आहे. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आरोपीला शिक्षा देणं हे न्यायालयाचं काम आहे. दोन, अडीच तास चर्चा केल्यानंतर हा हत्यारा नाही हे माझ्या लक्षात आलं. मनोबल उंच होणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ज्यावेळी दोषी ठरेल तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मला अंतकरणाने निर्दोष वाटल्याने मी पाठराखण केली आहे".

'धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं विधान, म्हणाले 'हा विषय...'

पुढे त्यांनी स्पष्ट केलं की, "माझा शब्द चुकला आहे. ही व्यक्तिगत नसून भगवानगडाची भूमिका आहे.  धनंजय मुडेंना माझा आणि भगवानगडाचा पाठिंबा आहे. गेल्या एक महिन्यात किर्तनं करत असताना, लोकांमध्ये जाताना मी भावना समजून घेतली आणि त्यातून हे वाक्य तयार केलं. भगवानगड भक्कमपणे धनंजयच्या पाठीशी आहे. माझ्यासह भगवानगडाची ही भूमिका आहे".

 'मुंडेंना जगू नये असं वाटत होतं,' नामदेव शास्त्रींनी सांगितली भगवानगडावरील भेटीमागची गोष्ट

"नामदेव शास्त्रींच्या जवळ आहेत ते सगळे शास्त्री, वारकरी नसतात. त्याच्यातील एखाद्याने दोष, गुन्हा केला म्हणून नामदेव शास्त्री दोषी ठरत नाहीत. धनंजय यांचं राजकीय व्यक्तिमत्व आहे. राजकीय व्यक्तिमत्वात हजारो कार्यकर्ते, लोक जवळपास असतात. म्हणून हत्येला समर्थन देतो असं मानणं योग्य नाही," असंही ते म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले की, "मला समर्थन नको आहे. पण धनंजय यांचं सामाजिक कार्य मी पाहिलं आहे, किंवा जे नाथ प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम झाले आहेत कदाचित यामुळे चांगल्या मताने ते निवडून आले आहेत हे मान्य करावं लागेल. हत्येला माझा पाठिंबा नाही, विरोध आहे. पण धनंजय चांगलं काम करतात याला माझा आणि भगवानगडाचा पाठिंबा आहे".