The Great Khali in Mahakumbh: माजी भारतीय WWE कुस्तीगीर 'द ग्रेट खली' गुरुवारी महाकुंभमेळ्यात संगमात पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचला. खलीने इंस्टाग्रामला फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने आपल्यासह सहकारीही होते, ज्यांनी पवित्र स्नान करताना मदत केली असं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा मेळावा मानला जाणारा महाकुंभ 2025 सुरु असून त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी असंख्य लोक पोहोचले आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
'द ग्रेट खली'ने आपल्या इंस्टाग्रामला अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यावेळी तो पवित्र स्नान घेत असल्याचं दिसत आहे. मात्र खलीला पाहिल्यानंतर तिथे एकच झुंबड उडाली होती. अनेक अतिउत्साही भक्त आणि सुरक्षा रक्षकांनी सेल्फीसाठी त्याला घेरलं होतं. यामुळे पोलिसांसह प्रशासनाची एकच धावपळ झाली.
द ग्रेट खली याच्याव्यतिरिक्त अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमननेही त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. मौनी अमावस्येच्या निमित्ताने त्याने पत्नी अंकितासह पवित्र स्नान केलं.
इंस्टाग्रामवर अभिनेता मिलिंद सोमणने संगमात पवित्र स्नान करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान त्याने बुधवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे.
फोटोंमध्ये, अभिनेत्याने त्रिवेणी संगमात स्नान करताना पिवळं धोतर परिधान केल्याचं दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिलं आहे की, "मौनी अमावस्येच्या खास दिवशी अंकितासोबत महाकुंभात येण्याचा आनंद झाला! असा आध्यात्मिक अवकाश आणि अनुभव मला आठवण करून देतो की मी अस्तित्वाच्या विशालतेत किती लहान आणि तुच्छ आहे आणि आपण येथे असलेला प्रत्येक क्षण किती खास आहे. माझे हृदय भरून आले असले तरी, काल रात्रीच्या घटनांमुळे मी दुःखी आहे आणि माझ्या प्रार्थना प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसोबत आहेत. हर हर गंगे! हर हर महादेव!!"
त्याच दिवशी, ज्येष्ठ अभिनेत्री-राजकारणी हेमा मालिनी यांनीही मौनी अमावस्येच्या निमित्ताने प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात स्नान केले. "या शुभ दिवशी मला 'स्नान' करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे," असं भाजप खासदार म्हणाल्या. हेमा मालिनी यांच्याव्यतिरिक्त, सुनील ग्रोव्हर, कबीर खान, गुरु रंधावा, अविनाश तिवारी, ममता कुलकर्णी आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही या भव्य धार्मिक मेळाव्यात भाग घेतला आहे.