Cidco lottery 2025: आपल्या हक्काचे आणि पसंतीचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण सध्या घराच्या किंमती परवडणाऱ्या नाहीयत. त्यामुळे घर घेण्यास इच्छुक नागरिक म्हाडा, सिडकोच्या लॉटरीची वाट पाहत असतात. तुम्हीदेखील तुमचे पसंतीचे सिडको घर शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
सिडको लॉटरीअंतर्गत एकूण 26 हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. पण यासाठी इच्छुकांची संख्या तुलनेत फार कमी आहे. यासाठी सुमारे 22 हजार अर्जदारांनी अर्ज केले आहेत. अर्ज प्रक्रिया यूजर फ्रेण्डली बनवण्यासाठी सिडकोने अर्ज प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रक्रिया सोपी केली आहेत. या दुरुस्तीअंतर्गत सिडको लॉटरी अर्जदारांना जास्त मूल्याच्या स्टॅम्प पेपरवर बारकोड केलेले अधिवास प्रमाणपत्र किंवा नोटरीकृत शपथपत्र सादर करण्याची आवश्यकता नसेल. यानंतर अर्जदारांची संख्या वाढेल, अशी सिडकोला अपेक्षा आहे.
सिडकोच्या या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेली 26 हजार घरे ही सिडको 27 नोड्समध्ये बांधत असलेल्या 67 घरांचा भाग आहेत. यापैकी 43 हजार घरांना महारेराकडून आधीच मान्यता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत सिडको 22 मजली इमारती बांधत आहे. ज्यापैकी 50 टक्के इमारती तळोजा नोडमध्ये आहेत. सोडतीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता रायगड इस्टेट फेज-1, सेक्टर 28, तळोजा पंचानंद येथे होणार आहे.
'माझे पसंतीचे सिडको घर' या सामूहिक गृहनिर्माण योजनेची अंतिम तारीख आता 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. नोंदणी विंडो 30 जानेवारी 2025 पर्यंत खुली राहील. 12 ऑक्टोबर 2024पासून सुरू झालेल्या या लॉटरीची अंतिम मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर होती आणि त्यापूर्वी ती 11 नोव्हेंबर 2024 होती. 8 जानेवारीवा सिडकोने माय प्रेफर्ड सिडको होम लॉटरीमध्ये देण्यात येणाऱ्या घरांच्या किमती जाहीर केल्या होत्या.
सिडको लॉटरी 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदारांना 236 रुपये नोंदणी शुल्कासह अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) जमा करावे लागेल. नोंदणी शुल्काची रक्कम परत न करण्यायोग्य असेल याची नोंद घ्या.
वाशी, तळोजा, खारघर, मानसरोवर येथे सिडको लॉंटरीतील घरे आहेत. ही सर्व ठिकाणे रेल्वे स्थानकांच्या अगदी जवळ आहेत, ज्यामुळे लोकांना प्रवास करणे सोपे होते. या चार ठिकाणांपैकी, खारघर हे सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण आहे. या लॉटरीअंतर्गत, खारघरमध्ये रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर 14 (डी मार्टजवळ) आणि खारघर व्हिलेज मेट्रो स्टेशनजवळ घरे उपलब्ध असतील.
तुम्ही सिडको लॉटरी 2025 साठी फक्त ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वप्रथम सिडको लॉटरीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि मोबाईल नंबर एंटर करा आणि लॉगिन करा. आधार आणि पॅन कार्डची पडताळणी करा आणि नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.नोंदणी शुल्कासाठी 236 रुपये भरा आणि सबमिट वर क्लिक करा. यानंतर EMD भरा आणि सबमिट करा.