तुमचं वाहन 2019 पूर्वीचं आहे का? मग ही बातमी वाचाच, 1 एप्रिलआधी नंबर प्लेट बदला अन्यथा बसेल भुर्दंड

तुमच्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट आहे का? नसेल तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2025, 09:52 PM IST
तुमचं वाहन 2019 पूर्वीचं आहे का? मग ही बातमी वाचाच, 1 एप्रिलआधी नंबर प्लेट बदला अन्यथा बसेल भुर्दंड title=

राज्यातील  वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमच्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट आहे का? नसेल तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. एका नव्या नियमामुळे मात्र वाहनचालक गोंधळलेले दिसत आहेत. 2019 पूर्वीच्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 31 मार्चपर्यंत ही मुदत देण्यात आली असून 1 एप्रिलपासून कारवाई केली जाणार आहे. यामुळे वाहनचालक मात्र काहीसे गोंधळलेले दिसत आहेत. 

वाहनधारकांनो जागे व्हा!, तुमची गाडी जर 2019 पूर्वीची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार वाहन उत्पादकांना 2019 एप्रिलनंतरच्या वाहनांना HSRP देणं बंधनकारक केलं होतं. मात्र  2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक नव्हतं. मात्र आता नव्या नियमानुसार राज्यात   2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं अनिवार्य आहे. 31 मार्चपर्यंत नवी नंबर प्लेट लावली नाही तर अशा वाहनचालकांना 1 हजारांपर्यंतचा भुर्दंड बसेल. या नंबर प्लेटमुळे वाहनधारकांची सुरक्षा योग्य प्रकारे होऊ शकते असा दावा वाहतूक प्रशासनानं केला आहे. 

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक असली तरी वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या प्रमुख शहरात नंबर प्लेट लावण्यासाठी खासगी एजन्सींना कंत्राट देण्यात आलं आहे.  

- महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या वेबसाईटवर नंबर प्लेटसाठी स्लॉट बुकींगचं लॉग इन होत नाही 

- अनेक वेळेस पैसे टाकूनही नंबर प्लेट मिळण्याची शाश्वती नाही

- स्लॉट बुकींगनंतर 90 दिवसांच्या आत नंबर प्लेट मिळणार, त्यामुळे 31 मार्चची डेडलाईन कशी पाळणार?

- बाजारात डुप्लिकेट प्लेटसचा सुळसुळाट

- लवकर नंबर प्लेट मिळवून देण्याच्या आरटीओ एजंट अधिक पैसै आकारतात ..

फॅन्सी नंबर प्लेटचं सध्या फॅड आहे, मात्र विचित्र पद्धतीने टाकलेले नंबर अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्पीड रडारमध्ये रीड होत नाहीत, आणि अपघातावेळी वाहन धारकांची ओळख पटवताना पोलिसांना अवघड जातं. आता या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना शिस्त येते का आणि अपघातांचं प्रमाण कमी होतं का हे पाहावं लागेल.