IND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड

IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2025, 09:36 PM IST
IND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड title=

IND vs ENG: आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीआधी भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात जबरदस्त खेळी करत चांगले संकेत दिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर इंग्लंड संघाविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली आहे. भारतीय संघाने इंग्लंडला क्लीन स्वीप दिला आहे. मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला. 

भारताने तब्बल 142 धावांनी सामना जिंकत मोठ्या विजयाची नोंद केली आहे. याआधी मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना 4 गडी राखून जिंकला होता. अशाप्रकारे भारतायी संघाने इंग्लंड संघाला 13 वर्षांनी द्विपक्षीय मालिकेत क्लीन स्विप दिला आहे. याआधी भारतीय संघाने ऑक्टोबर 2011 मध्ये इंग्लंड संघाला 5 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलं होतं. त्यावेळीही इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर होता. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. फक्त यावेळी मालिका तीन सामन्यांची होती. 

शुभमन गिल, श्रेयसची तुफान फलंदाजी

टॉस हारल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. भारतीय संघाने इंग्लंडसमोर 357 धावांचं भलंमोठं आव्हान उभं केलं होतं. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. गेल्या सामन्यातील शतक करणारा रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात बाद झाला. रोहितला वेगवान गोलंदाज मार्क वूडने यष्टीरक्षक फिल साल्टच्या हाती झेलबाद केले. रोहितने दोन चेंडूत फक्त 1 धाव काढली.

यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने 51 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने 50 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 73  वे अर्धशतक होते. विराट कोहली अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच पॅव्हेलियनमध्ये परतला. 

कोहली बाद झाल्यानंतर, श्रेयस अय्यरने शुभमन गिलसह जबाबदारी स्वीकारली. शुभमनने 95 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शुभमन गिलचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 7 वे शतक होते. श्रेयस अय्यरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस आणि शुभमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 104  धावांची भागीदारी केली. शुभमन 102 चेंडूत 112 धावा करून बाद झाला. श्रेयसने 64 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 78 धावा केल्या.

फक्त 34 ओव्हरमध्ये अख्खा संघ तंबूत

उत्तरादाखल इंग्लंड संघ 34.2 ओव्हर्समध्ये 214 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे 142 धावांनी त्यांनी सामना गमावला. अर्शदीप सिंह, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतले. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवला 1-1 विकेट मिळाली. 

भारताचे इंग्लंडविरोधातील सर्वात मोठे विजय (धावांनुसार)

158 धावा - राजकोट, 2008
142 धावा - अहमदाबाद, 2025
133 धावा - कार्डिफ, 2014
127 धावा - कोच्चि, 2013
126 धावा - हैदराबाद, 2011