विशाल करोळे, झी मीडिया, बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कैक दिवस उलटूनही अद्यापही या प्रकरणी आरोपींना शिक्षा होत नसल्यानं समाजातील विविध स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. एकिकडे सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून सातत्यानं आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठीची मागणी केली जात असतानाच बीडमध्ये गुन्हेगार प्रवृत्ती काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीय.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे आरोपी
मारहाणीनंतर अद्यापही फरार असल्याचं सांगण्यात येत असून, जखमी तरुणाला अंबाजोगाई येथून लातूरकडे उपचारासाठी रवाना करण्यात आलं.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस? असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने धारूर मधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्या, ही घटना घडल्यानंतर सदर प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप फरार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर पाठवण्यात आलं असून, त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून यासंदर्भात पोलीस अधिक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना करत आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे.
हत्येला इतके दिवस उलटूनही कृष्णा आंधळे फरार
9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी समाजातून संतप्त लाट उसळल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला आणि पोलिसांनी याप्रकरणी विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह इतर आरोपींना अटक केली. तर, वाल्मिक कराडला अवादा कंपनी खंडणीप्रकरणी अटक करत आरोपींवर मकोका लावण्यात आला. पण, आरोपी कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरारच आहे.