'त्या' बिल्डरचा अपहरण केलेला 7 वर्षांचा मुलगा अखेर सापडला; कारचा अपघात झाला अन्...

छत्रपती संभाजीनगरमधून बिल्डरच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. हा मुलगा 24 तासात सापडला असून तो सुखरुप आहे. 

Updated: Feb 6, 2025, 08:48 AM IST
'त्या' बिल्डरचा अपहरण केलेला 7 वर्षांचा मुलगा अखेर सापडला; कारचा अपघात झाला अन्... title=

विशाल करोळे, संभाजीनगर, झी मीडिया : दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षीय मुलाला संभाजी नगर पोलिसांनी अखेर सुखरूपपणे सोडवला आहे. मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान या मुलाला राहत्या घरासमोरून चार चाकी आलेल्या आरोपींनी गाडीत कोंबून नेलं होतं आणि त्याच्या वडिलांकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपींचा तपास घेतला. 100 सीसीटीव्ही तपासून पाहिले. अखेर हा मुलगा 24 तासांनी सापडला आहे.

मुलाचं अपहरण करुन आरोपी सिल्लोड मार्गे पळून जात होते. मात्र भोकरदन जवळ या आरोपींच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामुळे हे आरोपी पोलिसांना सापडले. पोलिसांनीही लागलीच या सर्व 4 आरोपींना ताब्यात घेतला आहे आणि मुलाला त्याच्या राहत्या घरी आणला आहे. 

महत्त्वाचं म्हणजे या आरोपींना शोधण्यासाठी संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील सर्वच अधिकारी कर्मचारी कामाला लागले होते संपूर्ण शहराचे पोलीस रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी तपास करत होते 100 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी केली. संभाजीनगर सह नाशिक नगर जळगाव या सर्व पोलिसांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती आणि नाकाबंदी करण्यात आले होती.

कसं केलं होतं अपहरण? 

मिळालेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलगा दोघंही एकत्र घराबाहेर पडले होते. फिरण्यासाठी दोघंही घराबाहेर पडले होते. वडील पुढे चालत असतानाच मुलगा सायकलवर मागून येत होता. त्यानंतर अचानक एक काळ्या रंगाची चारचाकी आली आणि मुलाला वडिलांच्या डोळ्यांदेखत उचलून नेले. मंगळवारी रात्री 9च्या सुमारास सिडको एन-4 मध्ये ही घटना घडली होती. 

चैतन्य सुनील तुपे असं अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. चारचाकीतून तिघे जण उतरले अन् मुलाला सायकलवरून उचलून गाडीत घालून घेऊन गेले. सुरुवातीला ही चारचाकी आधी जयभवानीनगरकडे गेली नंतर सिडकोमार्गे शहराबाहेर पळून गेले असल्याचे समोर आले आहे होते. 

मुलाचे वडिल नामांकित बिल्डर 

पोलिसांनी फोन ट्रेस केल्यानंतर सिल्लोडजवळ बंद झाल्याची सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलाचे वडिल हे बिल्डर असल्यामुळं त्यांच्या साइटवरील मजुरांचीदेखील चौकशी सुरू होती. तसंच, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही चौकशी सुरू होती. अखेर पोलिसांना 24 तासांत मुलाचा शोध लागला.