MHADA Lottery : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसह 117 भूखंडांसाठीची सोडत जाहीर केली. याच कार्यक्रमादरम्यान शासन आणि म्हाडाच्या वतीनं शिंदेंनी अत्यंत महत्त्वाची बाब जाहीर करत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य वर्गासाठी आशेचा किरण दिला. म्हाडाच्या या आगामी योजनांचा आराखडा पाहता पाच वर्षांमध्ये स्वत:च्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मंडळींना अनामत रकमेसह Home Loan ची जुळवाजुळव करण्यासाठीसुजद्धा पुरेसा वेळ मिळणार असल्याचं स्पष्ट झालं.
2147 घरांची लॉटरी काढली असल्याचं सांगत या सोडत प्रक्रियेमध्ये 31 हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते त्यामुळे म्हाडाच्या घरांना आता मागणी वाढत चालली आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. म्हाडावर नागरिकांचा विश्वास वाढत चालला असून, म्हाडाच्या घरांचा दर्जा उत्तम असून, इच्छुकांना वेळेवर घरं मिळत आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
पुढील पाच वर्षांमध्ये म्हाडाच्या वतीनं 8 लाख घरं उभारण्यात येणार असून, खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच याची ग्वाही दिली. घरांच्या गुणवत्तेपासून त्यांच्या दर्जापर्यंतची पाहणी आपण प्रत्यक्ष तपासणार असल्याची हमीसुद्धा त्यांनी दिली. शिंदेंच्या या वक्तव्यामुळं घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणि त्यातही म्हाडाच्या सोडतीकडे लक्ष लागून राहिलेल्यांना आर्थिक नियोजनासही पुरेसा वेळ मिळणार ही बाब नाकारता येत नाही.
म्हाडाच्या नव्या गृहनिर्माण धोरणांना समाजातील कैक घटकांना फायदा
म्हाडाची लॉटरी ही पारदर्शक पद्धतीनं निघते ही बाब शिंदेंनी या कार्यक्रमादरम्यान समोर आणली. याचवेळी त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला म्हाडाचं घर देण्याच्या दृष्टीनं भविष्यात म्हाडा लाखो घरांची उभारणी करेल या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
दरम्यान येत्या काळात म्हाडा नवं धोरण आत्मसात करणार असून, त्यामध्ये परवडणारी घरं, भाड्याची घरं, ज्येष्ठांसाठीची घरं, काम करणाऱ्या महिलांसाठी घरं राखीव ठेवली जाणार असून, त्याअंतर्गत अनेक पात्र इच्छुकांना ही घरं टप्प्याटप्प्यानं दिली जातील असंही शिंदेंनी सांगितलं. गिरणी कामगार आणि डबेवाल्यांच्या घरांचा मुद्दाही त्यांनी दृष्टीक्षेपात आणत म्हाडाच्या वतीनं विद्यार्थी वसतीगृहसुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती दिली.