...म्हणून सलमान नाईटी घालून नाचला! सुरज बडजातिया खुलासा करत म्हणाले, 'माधुरीने स्वत:...'

Salman Khan wearing a Nighty: सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडलेले. त्याचबद्दल आता एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 6, 2025, 11:07 AM IST
...म्हणून सलमान नाईटी घालून नाचला! सुरज बडजातिया खुलासा करत म्हणाले, 'माधुरीने स्वत:...' title=
स्वत: दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

Salman Khan wearing a Nighty: सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा 'हम आपके है कौन' हा चित्रपट एव्हर ग्रीन फॅमेली ड्रामा चित्रपटांपैकी एक आहे. आजही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेल्या काही मोजक्या कौटुंबिक चित्रपटांमध्ये आवर्जून 'हम आपके है कौन'चं नाव घेतलं जातं. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज बडजातिया यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात या चित्रपटाबद्दल काही रंजक खुलासे केले आहेत. सुरज बडजातिया हे 'इंडियन आयडॉल'मध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये ऋतिका नावाच्या स्पर्धकाने 'हम आपके है कौन'मधील 'दिदी तेरा देवर दिवाना' या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. हा डान्स पाहून सुरज बडजातियांनी या गाण्यासंदर्भातील काही रंजक आठवणी सांगितल्या. या गाण्यामध्ये सलमान खानने नाईटी का परिधान केली होती याबद्दलचा भन्नाट किस्सा दिग्दर्शकाने सर्वांना सांगितला.

16 दिवस शूट झालं हे गाणं

'दिदी तेरा देवर दिवाना' गाण्याच्या शेवटी सलमान नाईटी परिधान करुन डान्स करेल ही संकल्पना सुरज बडजातियांना सुचली होती, असं त्यांनी स्वत: सांगितलं. सलमान नाईट परिधान करुन नाचण्यासाठी तयारही झाला मात्र निर्मात्यांना यासाठी राजी करण्यात माधुरीनेच मदत केल्याचंही ते म्हणाले. हे गाणं शूट करण्यासाठी 16 दिवसांचा कालावधी लागल्याचं सुरज बडजातिया म्हणाले. "हे फार लांबलचक आणि सविस्तर गाणं होतं. ते शूट करण्यासाठी आम्हाला 16 दिवसांचा सराव लागला आणि 9 दिवसांमध्ये आम्ही ते टप्प्याटप्प्यात शूट केलं. आम्हाला हे गाणं हाय नोटवर संपवायचं होतं. गाण्याचा शेवट मजेदार आणि तितकाच उत्साही हवा होता," असं सुरज बडजातियांनी सांगितलं. "मी माझ्या वडिलांना सल्ला दिला की गाण्याच्या शेवटच्या सीनमध्ये सलमान नाईटी घालून येईल. सलमानने तात्काळ होकार दिला. मात्र माझ्या वडिलांना ही कल्पना पटली नाही हे चांगलं दिसणार नाही असं ते म्हणाले होते," अशी माहिती सुरज बडजातिया यांनी दिली.

शेवटच्या सीनला माधुरीने स्वत:...

मात्र शेवटच्या सीनमध्ये सलमानला नाईटी परिधान केल्याचं दाखवण्याबद्दल इतरांना काय वाटतं हे सुरज बडजातियांना तपासून पाहायचं होतं. सुरज बडजातियांनी अंतिम निर्णय घेण्याआधी इतर सहकलाकारांकडे याबद्दल विचारणा केली. आश्चर्याची बाब म्हणजे माधुरीला ही कल्पना फारच आवडली. तिने याला पाठिंबा दिला. "अनेकजण या कल्पनेवर सहमत होते. म्हणून आम्ही सेटवरील महिलांची मतं जाणून घेण्यासाठी त्यांचं मतदान घेण्याचं ठरवलं. यामध्ये सर्व डान्सर आणि माधुरीलाही ही कल्पना फारच मजेदार वाटली. आम्ही हे ठरल्याप्रमाणे शूट केलं आणि म्हणूनच सलमान नाईट घालून सर्वांसमोर येऊन नाचला. शेवटच्या सीनसाठी माधुरीने स्वत: सलमानचा मेकअप केला होता. या छान आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद," असं सुरज बडजातिया म्हणाले.

दमदार कमाई...

'हम आपके है कौन' मध्ये एकूण 14 गाणी आहेत. एवढी गाणी एकाच चित्रपटात असणं हे त्याकाळीही फार दुर्मिळ होतं. 1994 साली 'हम आपके है कौन' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्याने त्यावेळी तिकीटबारीवरील सर्व विक्रम मोडीत काढले होते. आजही हा सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे.