Illegal indian immigrants deported : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सर्व सूत्र हाती घेताच देशात नव्या पर्वाची सुरुवात झाली. नवे नियम लागू झाले आणि तातडीनं त्यांची अंमलबजावणीसुद्धा सुरु झाली. या निर्णय अन् आदेशांच्या अंमलबजावणीच्या सत्रामध्ये अमेरिकेत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना अखेर या देशानं बाहेरचा रस्ता दाखवत मायदेशी पाठवलं.
बुधवारीच अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आलेल्या या भारतीय नागरिकांचं एक विमान अमृतर इथं लँड झालं. कोणत्याही ओळखपत्र किंवा अधिकृत कागदोपत्री पुराव्याशिवाय अमेरिकेत मुक्कामी असणाऱ्या या भारतीयांचा परतीचा प्रवास जगातील या महासत्ता राष्ट्राच्याच एका लष्करी विमानातून झाला. या प्रवासादरम्यान त्यांना नेमकी कशी वागणूक मिळाली, याचं कथन त्यांनी मायदेशी येऊन केलं आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
'अमेरिका फर्स्ट' या तत्त्वाअंतर्गत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सध्या अमेरिकेतील अनेक मुद्द्यांमध्ये जातीनं लक्ष घालत स्थानिकांना प्राधान्यस्थानी ठेवत त्याच अनुषंगानं काही निर्णय घेतले. ज्यानंतर अमेरिकी संरक्षण यंत्रणांच्या माध्यमातून या देशात अवैध पुराव्यांच्या बळावर वास्तव्यास असणाऱ्या असंख्य परदेशी किंबहुना भारतीय नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. या भारतीयांची परेड घेतल्यानंतर त्यांच्या हाताबायात बेड्या ठोकत अमेरिकेच्या लष्करी मालवाहू विमानानं त्यांना मायदेशी पाठवण्यात आलं. अमृतसर इथं हे विमान लँड झाल्यानंतर त्यांच्या हातापायातील बेड्या काढण्यात आल्या अशी माहिती पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील जसपाल सिंगनं दिली.
ब्राझिलमध्ये सहा महिने राहिल्यानंतर जसपाल सीमा ओलांडून अमेरिकेत पोहोचला होता. जिथं, त्याला अमेरिकी सीमा सुरक्षा दलानं ताब्यात घेतलं होतं.
वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्यामुळं भारतात पाठवण्यात आलेल्या पंजाबमधील आणखी व्यक्तीनं आपले कपडे आणि साधारण 30 ते 35 हजार रुपयांची रोकड 'डंकी' मार्गावर लुटण्यात आल्याचं सांगितलं. सुरुवातीला त्याला आणि त्याच्यासह असणाऱ्या काही भारतीयांना लॅटीन अमेरिकेत पाठवण्याआधी इटलीला नेण्यात आलं होतं. 15 तासांचा जीवघेणा नौका प्रवास आणि 40 ते 45 किमीची पायपीट असा टप्पा त्यांनी ओलांडला. 'आम्ही जवळपास 17 ते 18 पर्वतरांगा ओलांडल्या. तिथं चुकूनही पाय घसरला तर थेट मृत्यू. आम्ही हा प्रकार डोळ्यांसमोर घडताना पाहिलाय. तिथं जर कोणाला काही झालं आणि तो तिथं राहिला... तर त्याला तिथंच मृत्यूच्या दाढेत सोडून दिलं जात होतं. आम्ही स्वत:च्या डोळ्यांनी तिथं मृतदेह पाहिलेयत', असा हादरवणारा घटनाक्रम अमेरिकेतून परतलेल्या भारतीय नागरिकानं सांगितला.