Ajit Pawar News: विधनासभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. महायुतीकडूनही मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. तसंच, अजित पवार कर्जतमधून लढणार तर बारामतीतून जय पवार उभे राहणार, अशी चर्चा आहे. अजित पवारांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते माध्यमांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
कर्जतमधून अजित पवार लढणार तर जय पवार बारामतीतून लढणार अशी चर्चा आहे. तसंच, काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीबद्दल माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी रात्री झालेल्या बैठकीबाबत बोलणं टाळलं तसंच, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे असं काही नाही, असं म्हणत उत्तर देणे टाळले आहे.
प्रत्येक वेळी मुलाखत द्या हे बरोबर नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आम्ही आमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन व्यवस्थित काम करत आहोत. आम्हाला युती टिकवायची आहे. आमच्या पद्धतीने काम सुरू आहे. अजित पवार यांना जेव्हा जय पवार बारामतीतून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असताा त्यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे, असं काही नाही. तुम्ही काही चर्चा कराल त्याला उत्तर द्यायला मी बांधील आहे का?, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक गुरुवारी रात्री पुण्यात पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या घरी ही बैठक झाली. बैठकीमध्ये अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ त्याचप्रमाणे नवाब मलिक उपस्थित होते अशी माहिती आहे. सध्या पक्षाची जनसमान यात्रा सुरू आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या निवडणुकीत राज्यातील संपूर्ण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद किती आहे तसेच संभाव्य उमेदवार कोण असू शकतो याबाबतचा अहवाल प्रत्येक जिल्हा अध्यक्ष कडून मागविण्यात येणार आहे. याशिवाय सध्या वेगवेगळ्या कारणावरून महायुती मध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार विधानसभा निवडणूक इच्छुक नसल्याचे देखील काल त्यांनी स्वतः म्हटलं होतं.