ख्रिसमसला भेटवस्तू देत आहात? तर सावध व्हा, कारण 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कर्करोग

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना भेटवस्तू देतात आणि या भेटवस्तू खास असाव्यात अशी सर्वांची इच्छा असते. प्रत्येकजण एकमेकांना खास भेटवस्तू देण्याचा प्रयत्न कर असतो.   

- | Updated: Dec 20, 2024, 04:06 PM IST
ख्रिसमसला भेटवस्तू देत आहात? तर सावध व्हा, कारण 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कर्करोग title=

डिसेंबर महिन्यात स्मार्ट वॉचेससारख्या आधुनिक गॅझेट्सना भेटवस्तू म्हणून मोठी मागणी आहे. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला स्मार्ट वॉच भेट देण्याचा विचार करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. स्मार्ट वॉचच्या बेल्टमध्ये असलेल्या धोकादायक रसायनांमुळे कर्करोग, वंध्यत्व आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. हे एका गंभीर अभ्यासात समोर आले आहे.

अमेरिकेतील नोट्रे डेम विद्यापीठातील संशोधकांनी 22 विविध स्मार्ट वॉच ब्रँड्सचा अभ्यास केला. या अभ्यासात 15 ब्रँड्समध्ये परफ्लूरोआल्किल आणि पॉलीफ्लूरोआल्किल  (PFAS) नावाची अत्यंत धोकादायक रसायनं आढळली. या रसायनांना 'फॉरएव्हर केमिकल्स' असेही म्हटले जाते कारण ते शरीरात किंवा वातावरणात नष्ट होत नाहीत आणि ते अनेक वर्षांपर्यंत अस्तित्वात राहतात. हे रसायन घड्याळाच्या पट्ट्यांमध्ये टिकाऊपणासाठी आणि अधिक मजबूत बनवण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे जर तुम्ही स्मार्ट वॉच खरेदी करत असाल, तर हे रसायन शरीराच्या संपर्कात येऊन त्याचा हानीकारक प्रभाव पडू शकतो.

कोणत्या आजारांचा धोका वाढतो?

PFAS च्या संपर्कात आल्याने अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये कर्करोग, थायरॉईडचे विकार, हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व आणि न्यूरोलॉजिकल विकारांचा समावेश होतो. ही रसायनं त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात. ज्या लोकांचा या रसायनांशी दीर्घकालीन संपर्क होतो त्यांना अधिक धोका असतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या लोकांनी 115 दिवस PFAS असलेले सनस्क्रीन वापरले, त्यांच्या त्वचेत सुमारे 1.6% रसायने शोषली गेली होती. स्मार्ट वॉचच्या बेल्टद्वारे त्वचेसोबत दीर्घकालीन संपर्क होणे, हे शरीरात या धोकादायक रसायनांचा प्रवेश होण्याची संधी निर्माण करतो.

धोका कसा होतो?
संशोधकांचे म्हणणे आहे की, स्मार्ट वॉचचे बेल्ट जेव्हा त्वचेला लागतात, तेव्हा हे रसायन त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू लागतात. त्यानंतर ते रक्तप्रवाहात समाविष्ट होतात आणि शरीरातील बऱ्याचं अवयवांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. हे रसायन शरीरात दीर्घकाळ राहतात आणि त्यांचे नष्ट होण्याचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे ते वेळोवेळी शरीरावर त्याचा परिणाम करत राहतात.

स्मार्ट वॉच खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा:

1. PFAS असलेल्या उत्पादने टाळा: स्मार्ट वॉच खरेदी करतांना PFAS असलेले ब्लेल्ट टाळावे.

2. बेल्ट बदलण्याचा विचार करा:  स्मार्ट वॉचचा सिलिकॉन किंवा प्लास्टिकचा बेल्ट लेदर किंवा इतर सुरक्षित मटेरियलपासून बनवलेल्या बेल्टने बदलावा. यामुळे तुम्ही रसायनांच्या संपर्कात कमी येऊ शकाल.

3. मर्यादित वेळेसाठी वापरा: स्मार्ट वॉचचा वापर मर्यादित वेळेसाठी करा. झोपताना ते काढा आणि शरीरावर अधिक ताण येणार नाही याची काळजी घ्या.

4. वयाच्या आणि शरीराच्या स्थितीनुसार वॉच वापरा: स्मार्ट वॉच खरेदी करतांना वय, आरोग्य आणि त्वचेशी असलेल्या संवेदनशीलतेनुसार योग्य ब्रँड निवडा. महागड्या वॉचेसमध्ये जास्त प्रमाणात PFAS असू शकतात हे देखील या अभ्यासात दिसून आले आहे.  

स्मार्ट वॉच खरेदी करतांना आणि वापरतांना योग्य आणि सुरक्षित निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या प्रियजनांचे आरोग्य संरक्षित राहील आणि त्यांना दिलेली भेटवस्तू त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही.)