Morning walk tips: हिवाळ्याच्या दिवसांत मॉर्निंग वॉक करणे ही शरीरासाठी एक चांगली सवय आहे, परंतु काही वेळा आपण अशा चुका करतो ज्या आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. या सवयीमुळे शरीरावर ताण येतो आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते. हिवाळ्यात मॉर्निंग वॉकसाठी जाताना कोणत्या चुका टाळाव्यात, याबद्दल जाणून घ्या.
हिवाळ्याच्या दिवसांतही अनेकांना फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय असते. थंड पाणी पिऊन लगेच मॉर्निंग वॉकला जाणे हे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. झोपेतून उठल्याबरोबर थंड पाणी पिणेही टाळावे. अशा सवयीमुळे हृदयावर वाईट परिणाम होतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो. आरोग्यतज्ज्ञ नेहमीच मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात.
हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांचा दिवस अलार्मने नाही तर चहा किंवा कॉफीने सुरू होतो. मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय कित्येकांना असते. मात्र, असे करणे शरीरासाठी अपायकारक ठरते. गरम चहा किंवा कॉफी पिऊन थंड हवेत बाहेर जाणे हे शरीराच्या तापमानावर विपरीत परिणाम करते. हृदयासाठी हे खूपच घातक ठरते. मॉर्निंग वॉकनंतर चहा किंवा कॉफी घेणे अधिक योग्य आहे.
डोकं भिजवून मॉर्निंग वॉकला जाणं टाळावं. काही लोक वॉक करताना गरम होतंय असं वाटून डोकं भिजवतात. परंतु, अशा सवयीमुळे सर्दी, खोकला किंवा ताप येण्याचा धोका असतो. शरीराला तापमान संतुलित करायला वेळ लागतो. डोकं भिजवून थंड हवेत बाहेर पडल्यास डोक्याच्या नसांवरही वाईट परिणाम होतो.
1. मॉर्निंग वॉकसाठी जाण्यापूर्वी कोमट पाणी प्या.
2. हलका व्यायाम करून शरीर गरम करा.
3. गरम कपडे, मफलर किंवा टोपी घालूनच बाहेर जा.
4. वॉकनंतर थोडी विश्रांती घ्या आणि नंतर कोमट चहा किंवा दूध प्या.
मॉर्निंग वॉक ही आरोग्यासाठी उपयुक्त सवय आहे, पण योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या चुका टाळून आपले आरोग्य उत्तम ठेवा!