Viral Video: पश्चिम बंगालच्या मैलाना अबुल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एका शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्याशी लग्न केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अप्लाइड सायकॉलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर पायल बॅनर्जी या व्हिडीओत दिसत होत्या. यामध्ये त्या कथितपणे पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यासह लग्न करताना दिसल्या होत्या. व्हिडीओत त्यांनी गळ्यात हार घातलेला असून, एखाद्या नववधूप्रमाणे नटलेल्या दिसत होत्या. दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी राजीनामा दिला आहे.
युनिव्हर्सिटीच्या रजिस्ट्रार पार्थ प्रतिम लाहिडी यांनी सांगितलं की, प्रोफेसरने 1 फेब्रुवारीला ईमेल पाठवून सध्या निर्माण झालेली स्थिती पाहता पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्याने मानसिकदृष्ट्या आपण खचलो असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. रजिस्ट्रारने सांगितलं की, "त्यांनी युनिव्हर्सिटीमधील आपल्या कार्यकाळासाठी आभार मानले आहेत. यापुढे काम करु शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे". दरम्यान युनिव्हर्सिटीने आधीच शिक्षिकेला 29 जानेवारीपर्यंत सुट्टीवर पाठवलं होतं.
वाद निर्माण झाल्यानंतर शिक्षिकेने आपली बाजू मांडली होती. हा सायको ड्रामा प्रोजेक्टचा भाग होता, जो युनिव्हर्सिटीच्या सहमतीने करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. हे लग्न नव्हतं, तर फ्रेशर्स पाटीसाठी बसवण्यात आलेलं एक नाटक होतं असाही दावा डॉक्टर पायल बॅनर्जीने केला आहे. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने लीक झाला असून, आपल्याला बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आला असा आरोप त्यांनी केला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठेचं नुकसान झाल्याने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
युनिव्हर्सिटीचे कार्यवाहक कुलपती तपस चक्रवर्ती यांनी ही घटना स्विकारली जाऊ शकत नाही असं स्पष्ट म्हटलं होतं. तसंच याप्रकरणी तपास समिती गठीत करणार असल्याचं सांगितलं होतं. या समितीने सायको-ड्रामा प्रोजेक्टचा दावा फेटाळून लावला होता.