Delhi Chunav Exit Poll Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी बुधवारी म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी सर्व 70 जागांवर मतदान पार पडलं. सध्या सर्व राजकीय पक्षांचं भवितव्य हे मतदानपेटीत कैद झालं आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. अशातच आता सर्वांचं लक्ष हे वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलवर लागून राहिले आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून दिल्लीत नेमकी कोणाची सत्ता येणार? कोणाला सर्वात जास्त बहुमत मिळणार याचा अंदाज लावण्यात आला आहे.
दरम्यान दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी बधुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान पार पडलं. यामध्ये काँग्रेसच्या जागांबद्दल वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. ज्यामध्ये दोन एजन्सींनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या निकालांमध्ये काँग्रेस आपले खाते उघताना दिसत आहे. तर भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलमध्ये कोणाला किती जागा?
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलमध्ये 39 ते 44 जागा या भाजपला मिळतील तर दुसऱ्या क्रमाकांवर 'आप'ला पक्षाला 25-28 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस पक्षाला 02-03 जागा मिळण्याची शक्यता आहे.
पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत आप पक्षाला 21 ते 31 जागा मिळू शकतात, तर भाजपला 39 ते 49 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं दिसत आहे.
दिल्ली विधानसभेचा बहुमताचा आकडा
दिल्ली विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 36 आहे. ज्यामध्ये दिल्लीत प्रामुख्याने तीन पक्षांमध्ये म्हणजेच आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होताना दिसत आहे. मतदानानंतर 70 विधानसभा मतदारसंघांमधील 699 उमेदवारांचे भवितव्य EVMमध्ये कैद झाले आहे. निवडणूक आयोगाकडून अंतिम निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.