Chhaava Trailer Update: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा नेहमी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अशातच आता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. त्याच्या आगामी बहुप्रतीक्षित 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या संघर्ष आणि शौर्यावर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन तर चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.
चित्रपटात विकी कौशलसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना देखील मूख्य भूमिकेत दिसणार आहेत.
22 जानेवारीला रिलीज होणार ट्रेलर
'छावा' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करताना निर्मात्यांनी ट्रेलरचे अपडेट शेअर केले आहेत. अभिनेत्याचा लूक पाहिल्यानंतर चाहते देखील या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. मात्र, आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार हे निश्चित झाले आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी म्हटले आहे की, 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. या दिनाचं औचित्य साधत 344 वर्षांनंतर आपण त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची कहाणी सांगणार आहोत. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून या चित्रपटाबद्दल चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
या दिवशी रिलीज होणार चित्रपट
अभिनेता विकी कौशलचा आगामी बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 19 फेब्रुवारीच्या आधी रिलीज होत असल्यामुळे या ऐतिहासिक गाथेचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीजबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'छावा' चित्रपटात विकी कौशलची आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे, जी त्याच्या करिअरमधील मोठी भूमिका ठरू शकते.