Salman Khan Podcast: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतीच आपला पुतण्या अरहान खानचा पॉडकास्ट 'दम बिर्याणी'मध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये अरहान खानसह त्याचे मित्र देव राजयानी, आरुष वर्मा हेदेखील हजर होते. मुलाखत इंग्रजीत सुरु असल्याने सलमान खानने एका क्षणी अरहानसह त्याच्या मित्रांना हिंदीत बोलण्यात सांगितलं. यावेळी त्यांनी आपलं हिंदी फार चांगलं नसल्याचं मान्य केलं. त्यानंतर सलमानने आपली नाराजी जाहीर करत तुम्हा सर्वांना लाज वाटली पाहिजे असं म्हटलं.
पॉडकास्ट दरम्यान, सलमानने अरहान आणि त्याच्या मित्रांना पॉडकास्ट करण्यामागील त्यांचा हेतू विचारला. यावर त्यांनी सांगितलं की, "आमची आवड आहे, आणि स्वतःसाठी आठवणी निर्माण करण्याचा एक मार्ग आहे ज्या ते नंतर जपू शकतील". त्यावर सलमान त्यांना म्हणाला की, "तुम्ही आधी हे सर्व हिंदीमध्ये करावे."
यावेळी अरहानच्या एका मित्राने अरहान आणि दुसऱ्या मित्राकडे बोट दाखवत यांना हिंदी येत नाही असं सांगितलं. त्यावर त्यांनी 'आमचं हिंदी फार वाईट आहे' असं मान्य केलं. यावर सलमान खानने त्यांना तुम्ही हिंदीत बोला, काही चुकलं तर मी ते सुधारतो असं आश्वस्त केलं.
अरहान यानंतर हसला आणि मस्करीत म्हणाला 'हिंदी क्लासेस, हिंदी शिक्षक, सराव करा'. यानंतर सलमान म्हणाला की, 'जर तुम्हाला हिंदी येत नसेल तर तुम्हाला स्वत:ची लाज वाटायला हवी. तुम्हाला हिंदी समजणाऱ्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचावं लागेल'.
पॉडकास्ट दरम्यान, सलमानने अरहान आणि त्याच्या मित्रांना त्यांच्या करिअर निवडींबद्दल प्रश्न विचारले आणि चित्रपट उद्योगात प्रवेश करण्यापूर्वी अरहानला त्याच्या ताकदी आणि कमकुवतपणा ओळखण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
सलमान खान सध्या त्याच्या अॅक्शन ड्रामा 'सिकंदर' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे. 28 मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय सलमान साजिद नाडियाडवालाच्या 'किक २' मध्येही दिसणार आहे. चित्रपट निर्मात्याने इंस्टाग्रामवर सुपरस्टारचा एक फोटो शेअर करून चित्रपटाची घोषणा केली. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे.