Thane Consumer Court : ग्राहकाने नियमाप्रमाणे केवायसी केलेली असतानाही कोणतीही सुचना न देता अचानक क्रेडिट कार्ड ब्लॉक करणा-या अमेरिकन एक्स्प्रेस बँकेला ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एक लाखाचा दंड ठोठावला आहे. भारताची वेलनेस अँबेसिडर डॉ. रेखा चौधरी यांच्यावतीने एल.आर.अँन्ड असोसिएट यांनी ग्राहक मंचात चौधरी यांची बाजू मांडली.
डॉ. रेखा चौधरी गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकन एक्सप्रेस प्लॅटिनम क्रेडिट कार्ड वापरत आहेत. 24 जानेवारी 202 रोजी जेव्हा बँकेने सी.बी. शंकर यांच्या नावाने जारी केलेले डॉ, रेखा चौधरी यांचे सप्लिमेंटरी कार्ड केवायसी प्रक्रिया पुर्ण न केल्याचे कारण देत ब्लॉक केले. मात्र डॉ. रेखा चौधरी यांनी 16 जानेवारी 2020 रोजीच आवश्यक केवायसी कागदपत्रे सादर केली होती. बँकेने हे कागदत्रे बरोबर असल्याने केवायसीसाठी जमा करुन घेतली होती.
मात्र, त्यांचे केवायसी करुन घेतले नाही. तसेच चौधरी यांचे कार्ड कोणतीही सुचना न देता ब्लॉक करुन टाकले. त्यामुळे चौधरी यांचे आर्थिक नुकसान झाले म्हणुन त्यांनी ठाणे जिल्हा तक्रार निवारण केंद्राकडे दाद मागितली. जिल्हा ग्राहक मंचाने दोन्ही बाजू ऐकूण घेत या प्रकरणात बँकेचा निष्काळजीपणा दिसून आला. त्यामुळे ठाणे ग्राहक मंचाने अमेरिकन एक्स्प्रेस बँकेला एक लाख रुपयांचा दंड आणि न्यायालयीन खर्च म्हणुन 10 हजार रुपये डॉ. रेखा चौधरी यांना देण्याचा आदेश दिला. एल. आर. अँन्ड असोसिएटच्यावतिने चौधरी यांची बाजू ग्राहक मंचाकडे मांडण्यात आली.