धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? भाजप-राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललंय?

Santosh Deshmukh Muder Case : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मागच्या 2 महिन्यापासून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीत टोलवाटोलवी सुरूय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नेमका कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

वनिता कांबळे | Updated: Feb 9, 2025, 11:34 PM IST
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? भाजप-राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललंय? title=

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरू झालीय की काय असा प्रश्न पडावा. राज्याचे प्रमुख या नात्यानं देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील असं अजित पवारांचं म्हणणं आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून राजीनाम्याचा अंतिम निर्णय अजितदादांचा असेल, असा देवेंद्र फडणवीसांचा युक्तीवाद आहे. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणा-या अंजली दमानियांनी मुख्यमंत्री आणि लोकायुक्तांना पत्र लिहिलंय. देशमुख हत्येला 2 महिने पूर्ण झालेत आता तरी राजीनामा होणार का? असा थेट सवाल दमानियांनी सरकारला केलाय. धनंजय मुंडे मंत्रीपदावर आहेत तोवर न्याय मिळणार नसल्याचंही दमानियांनी म्हटलंय.

भाजप आमदार सुरेश धसही संतोष देशमुख प्रकरणात सातत्यानं आवाज उठवत आहेत. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कोर्टातच चेंडू टोलवलाय. मुंडेंच्या राजीनाम्यावरून भाजपची भूमिका स्पष्ट असून राष्ट्रवादीची यात बदनामी होत आहे, असा दावाही धस यांनी केलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राजीनाम्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनीच मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सोनवणे यांनी केलीय.

भाजप आणि राष्ट्रवादीत राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे हे आता स्पष्ट दिसतंय. या सगळ्या राजकारणापेक्षा देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणं अधिक महत्त्वाचं असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. अंजली दमानियांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी भेट घेऊन मुंडेंविरोधात पुरावे सादर केले होते. त्यावरच न थांबता अंजली दमानियांनी कृषी खात्यातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली. विरोधकही सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशावेळी राजीनाम्याबाबत ठोस निर्णय घेण्याऐवजी भाजप आणि राष्ट्रवादीत एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.