Tejaswini Pandit Tweet : सध्या लोकसभा निवडणुकांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वीच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. यानुसार देशभरात सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडमोडींना वेग आला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते. यानंतर आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आता तिने अधिकृत ट्विटवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तेजस्विनीने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह का आणि कशासाठी केला? त्यामागील कारण काय होते? याबद्दल नमूद करण्यात आले आहे. यासोबतच यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याच कारणामुळे प्रेरणादायी आहे, अशीही ओळ यात दिसत आहे.
तेजस्विनीने हा फोटो पोस्ट करताना "पुरंदरचा तह…. पण राजा वर विश्वास…कायम !!" असे ट्वीटमधील कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यावर अनेक जण संमिश्र कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या ट्वीटचा संबंध अनेकजण राज ठाकरे आणि अमित शाहांसोबत लावताना दिसत आहेत. पण तिने तिच्या या ट्वीटमध्ये याबद्दल कोणातीही उल्लेख केलेला नाही. सध्या तिचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे.
पुरंदरचा तह….
पण राजा वर विश्वास…कायम !! pic.twitter.com/uMa7FKGLKp
— TEJASWWINI (@tejaswwini) March 21, 2024
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार की नाही यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. नवी दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी 2 जागा देण्याची मागणी अमित शाह आणि भाजपाच्या राज्यातील नेत्यांकडे केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र भाजपा मनसेसाठी 2 जागा सोडण्यास तयार नसून एका जागेवर तुम्ही लढावं असं मनसेला सांगण्यात आलं आहे. तसेच मनसेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेतल्यास शिंदे गट आणि पवार गट नाराज होऊन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच मनसेला महायुतीमधील एका पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच मनसेनं महायुतीमधील घटक पक्ष म्हणून लढावं असा प्रस्ताव राज ठाकरेंना देण्यात आल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी केला आहे.