बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीला (Arshad Warsi) प्रभासला (Prabhas) जोकर म्हटल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. Kalki 2898 AD चित्रपटात प्रभास जोकर वाटत होता असं अर्शद वारसीने म्हटलं आहे. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अर्शद वारसीला ट्रोल केलं जात आहे. दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी यावर नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याने अर्शद वारसीने इंस्टाग्रावर कुटुंबावर द्वेषपूर्ण कमेंट्स येऊ नये यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.
अर्शदने प्रभासला जोकर म्हटल्यापासून त्याला द्वेषाचा सामना करावा लागत आहे. यावर त्याने भाष्य केलेलं नाही. मात्र इंस्टाग्रामवर कुटुंबासह शेअर केलेल्या फोटोवरील कमेंट बंद केल्या आहेत.
अर्शदने स्वातंत्र्यदिनी पत्नी मारिया आणि मुलीसह फोटो सेअर केला होता. प्रभाससंबंधी केलेल्या विधानानंतर त्याच्या फोटोवर निगेटिव्ह कमेंट्सचा पूर सुरु आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे की, 'तुझी औकात काय आहे?'. एकाने त्याला प्रभासची माफी मागण्यास सांगितलं आहे. तर एकाने तुझे आयुष्यभराचे कलेक्शन प्रभासच्या मानधनाएवढे आहे असं सुनावलं आहे. आपल्यावर टीका होताना कुटुंबालाही त्यात ओढलं जात असल्याने अर्शदने इंस्टाग्रामवर कमेंट बंद कऱण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.
"मी कल्की पाहिला, मला आवडला नाही. अमितजींनी आजवर खूप चांगलं काम केलं. मी त्या माणसाला कधीच समजू शकत नव्हतो. खरंच बोलतोय जर आपल्यात त्या माणसाइतकी ताकद असेल, तर आयुष्यात आपण कुठेच थांबणार नाही. ते अनरियल आहेत," असं कौतुक करताना अर्शदने प्रभासला जोकर म्हटलं.
"प्रभास, मला फार वाईट वाटत आहे. पण तो असा जोकरसारखा का दिसत होता? मला त्याला मॅड मॅक्स, मेल गिस्बनसारखं पाहायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं. तुम्ही त्याला काय बनवलं. दिग्दर्शक असं का करतात? हे मला समजत नाही," असंही तो म्हणाला. 'कल्की 2898 एडी' नाग अश्विनने दिग्दर्शित केला होता आणि त्यात दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत होती.
नाग अश्विन दिग्दर्शित, कल्की 2898 एडी जुलैमध्ये रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रचंड व्यावसायिक यश मिळालं. चित्रपटाने जगभरात 1100 कोटींची कमाई केली. चित्रपटात, प्रभासने काशीतील भैरव नावाच्या बाउंटी हंटरची भूमिका निभावली आहे. अमिताभ यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली.