Anuja : भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा निर्मित 'अनुजा' या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मच्या श्रेणीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे हे नामांकन पुढे ढकलण्यात आले होते, परंतु आता ते गुरुवारी 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी हे 17 जानेवारीला जाहीर होणार होते.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्कर पुरस्कार 2025 साठी जगभरातील चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आलीये. यामध्ये 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत आपले स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपटात 9 वर्षांच्या 'अनुजा'ची कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲडम जे. ग्रेव्हज यांनी केले आहे. हा एक भारतीय-अमेरिकन चित्रपट आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
या चित्रपटाची कथा एका 9 वर्षांच्या मुलीभोवती फिरते जिला तिची मोठी बहीण पलकप्रमाणेच कारखान्यात काम करणे आणि अभ्यास करणे यापैकी एक निवडणे भाग पडते. तिला बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्याची सुवर्णसंधी मिळते. 'अनुजा'साठी हा एक निर्णय आहे जो तिचे आणि तिच्या बहिणीचे आयुष्य बदलून टाकेल. या चित्रपटातील 'अनुजा'ची भूमिका 9 वर्षांची मुलगी सजदा पठाण हिने साकारली आहे. सजदाने यापूर्वी 2023 मध्ये आलेल्या 'द ब्रेड' या चित्रपटात देखील काम केले आहे.
Short on time, big on talent, here are this year's nominees for Live Action Short Film. #Oscars pic.twitter.com/Wx0TZIpUen
— The Academy (@TheAcademy) January 23, 2025
अनन्या शानभागने 'अनुजा' चित्रपटात सजदा पठाणच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहे. यासोबतच या शॉर्ट फिल्ममध्ये नागेश भोसले आणि गुलशन वालिया देखील आहेत. स्कार्स पुरस्कार सोहळा हा 2 मार्च 2025 रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन कॉनन ओब्रायन करणार आहेत. तर 'अनुजा' ने आतापर्यंत न्यूयॉर्क शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2024, हॉलिवूड शॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट लाइव्ह इन ॲक्शन फिल्म आणि मॉन्ट क्लेअर फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जिंकले आहेत.