Viral News : नोकरीचं (Job News) क्षेत्र खासगी असो किंवा सरकारी, प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी काही नियम आणि सुविधांची आखणी केलेली असते. कंबनीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं काम होण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही नियमाचं काटेकोरपणे पालनही करावं लागतं. पण, काही कंपन्या मात्र इथं अपवाद ठरतात. कारण, या कंपन्या कर्मचाऱ्यांच्याच कलानं निर्णय घेत त्यांना आवडतील असेच निर्णय घेण्यावर भर देतात, त्यांच्यावर सुविधांची बरसात करतात.
ऑडिटी सेंट्रलच्या एका अहवालानुसार जपानमधील ओसाका इथं असणाऱ्या एका कमी उलाढाल असणाऱ्या टेक नावाच्या कंपनीकडून ऑफिस कल्चरअंतर्गत एक नवी योजना आणली आहे. जिथं चक्क मद्य अर्थात कर्मचाऱ्यांना दारू आणि हँगओवर लिव देण्याची योजना आखली आहे. अशा सुविधेमुळं कर्मचारी आणखी चांगलं काम करतील असा कंपनीचा विश्वास असून, या कंपनीचं नाव आहे ट्रस्ट रिंग कंपनी लिमिटेड.
उपलब्ध माहितीनुसार या कंपनीमध्ये अतिशय कमाल आणि खेळीमेळीचा माहोल असून तिथं खुद्द सीईओच कर्मचाऱ्यांसमवेत अशा पार्टी करतात. इतकंच नव्हे, तर हे मद्याचे प्याले खुद्द सीईओच भरतात. त्यांच्यामते असं केल्यानं कर्मचाऱ्यांशी खेळीमेळीचं आणि मैत्रीचं नातं तयार होतं. बरं, आता या अशा पार्टीनंतर कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास झाला तर या कर्मचाऱ्यांना ही नशा उतरवण्यासाठी रितसर सुट्टीसुद्धा दिली जाणार आहे. ही सुट्टी 2 ते 3 तास किंवा दिवसभराची असू शकते.
कंपनीमध्ये सतत आनंदी वातावरण तयार करण्यासाठी आणि ते टीकवून
ठेवण्यासाठी म्हणून ही मंडळी कायम असल्याचं म्हटलं जात आहे. एकिकडे भारतात नोकरी, नोकरीचे तास यांवरून अनेक मतमतांतरं असतानाच दुसरीकडे या अशा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मिळणारी हक्काची आणि प्रेमाची वागणूक भारावून सोडते हे खरं. मागील काही वर्षांमध्ये अनेक छोटेखानी कंपन्यांमध्ये या चौकटीबाहेरच्या योजना आणि कार्यपद्धतीचा अवलंब केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या यामध्ये यशस्वी ठरत स्वत:चा आणि कर्मचाऱ्यांचाही फायदाच करत आहेत.