शेजाऱ्याचे आपल्या आईसह प्रेमसंबंध, मुलाने काटा काढण्यासाठी लावला इलेक्ट्रिक ट्रॅप, पण 'ती' एक चूक अन् अख्खं कुटुंब...

पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडित शेतात सापडला होता. जवळपास कोणतीही इलेक्ट्रिकल वायर नसल्याने पोलिसांना संशय आला.   

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2025, 04:41 PM IST
शेजाऱ्याचे आपल्या आईसह प्रेमसंबंध, मुलाने काटा काढण्यासाठी लावला इलेक्ट्रिक ट्रॅप, पण 'ती' एक चूक अन् अख्खं कुटुंब... title=

आपल्या शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिताचे आपल्या आईशी प्रेमसंबंध असल्याने आरोपी तरुणाने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने इलेक्ट्रिक ट्रॅप लावला होता. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे असून तो अलाप्पुझा जिल्ह्यातील पुन्नाप्रा उत्तर येथे वास्तव्यास आहे. त्याचं नाव कैथवलप्पिल किरण असून पीडितचे नाव कल्लुपुरकेला दिनेशन (53) असं आहे.

शनिवारी सकाळी भाताच्या शेतीत दिनेशनचा मृतदेह सापडला होता. वीजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी आरोपी किरणच्या आई-वडिलांनाही अटक केली आहे. कारण त्यांनी मुलाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास आणि पुरावे नष्ट करण्यास मदत केली होती. 

स्थानिकांना शनिवारी सकाळी दिनेशनचा मृतदेह शेतात पडलेला दिसला होता. पण त्यांना सुरुवातीला तो दारु पिऊन मद्यावस्थेत पडला असल्याचं वाटलं. पण नंतर त्याचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. 

अंबलाप्पुझाचे सह-पोलीस अधिक्षक के.एन. राजेश यांनी सांगितलं की, "सुरुवातीला कोणीही दिनेशनच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली नाही. चौकशीतही काहीही संशयास्पद आढळले नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण वीजेचा धक्का असल्याचं  सांगण्यात आलं. मृतदेह अशा ठिकाणी आढळला होता जिथे वीजेच्या तारा नव्हत्या. यामुळे आम्हाला हत्येचा संशय आला. आम्ही स्थानिक लोकांकडे चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळलं की किरणचा दिनेशनच्या त्याच्या आईशी असलेल्या संबंधांमुळे त्याच्यावर राग होता. काही वर्षांपूर्वी किरणचे दिनेशनशी यावरून भांडण झाले होते. चौकशीत किरणने गुन्ह्याची कबुली दिली."

दोन्ही कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत होतं. पण पत्नीसोबत वाद असल्याने दिनेशन लॉजमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री किरणला दिनेशन येणार याची कल्पना असल्याने इलेक्ट्रिक जाळं लावलं होतं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणने इन्सुलेशनशिवाय लोखंडी तार वापरली आणि दिनेशन ज्या दारातून प्रवेश करायचा त्या दाराशी सापळा रचला. घरातील पॉवर सॉकेटमधून वीजपुरवठा काढून घेण्यात आला. “घरात प्रवेश करताना दिनेशनला विजेचा धक्का बसला. त्यानंतर किरणने जवळच्या भातशेतीत मृतदेह फेकून देण्यासाठी त्याच्या पालकांची मदत घेतली,” असं उपअधीक्षकांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, किरण बांधकाम क्षेत्रात काम करतो, तर त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात.