सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भिकाऱ्यांसंबंधी पाकिस्तानला (Pakistan) चेतावणी दिली आहे. पाकिस्तानातून मोठ्या संख्येने नागरिक धार्मिक यात्रेसाठी येतात. पण नंतर तिथे राहून ते भीक मागण्यास सुरुवात करतात. सौदी अरेबियात याकडे मोठी समस्या म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानाला भिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं आहे. जर तुम्ही यावर नियंत्रण आणलं नाही तर पाकिस्तानी हज आणि उमराहच्या यात्रेकरुंवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो असा इशाराही सौदीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसंच जर तुम्ही नियंत्रण आणलं नाही तर तुमच्यावर काही निर्बंध आणले जातील अशा शब्दांत सौदी अरेबियाने इशारा दिला आहे.
सौदी अरबच्या हज मंत्रालयाने पाकिस्तानच्या धार्मिक गोष्टींशी संबंधित मंत्रालयाला एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी उमराह व्हिसा घेऊन सौदीत प्रवेश कऱणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्देश दिला आहे. प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने "उमराह कायदा" लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ट्रॅव्हल एजन्सींना त्याचे निरीक्षण करण्याची जबाबदारी दिली जाईल, जे सहसा व्हिसा आणि इतर कार्ये हाताळतात.
उमरा ही मक्केला जाणारी इस्लामिक तीर्थयात्रा आहे जी वर्षाच्या कोणत्याही वेळी केली जाऊ शकते. हजची यात्रा मात्र इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेनुसार विशिष्ट तारखा असलेल्या दिवशीच केली जाते. पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने मंगळवारी वृत्त दिल की, “सौदीच्या हज मंत्रालयाने पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाला एक चेतावणी जारी केली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांना उमराह व्हिसाच्या अंतर्गत राज्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी कारवाईची विनंती केली आहे”.
धार्मिक तीर्थयात्रेच्या बहाण्याने भिकारी सौदी अरेबियात प्रवेश करू नयेत यासाठी सौदीने पाकिस्तान सरकारला उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या वर्षी सौदीचे राजदूत नवाफ बिन सईद अहमद अल-मल्की यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानात भिकारी पाठवणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे (FIA) या कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सौदीत भिकाऱ्यांच्या बेकायदेशीर प्रवेशाची सोय करणाऱ्या माफियांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
गेल्या महिन्यात सौदीला जाणाऱ्या एका विमानातून 11 कथित भिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं होतं. चौकशीदरम्यान आपला भीक मागण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. अशाच प्रकारे 2022 मध्ये विमानातील 16 कथित भिकाऱ्यांना विमानातून उतरवून अटक करण्यात आली होती. सौदीमध्ये पाकिटमारी करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त असते.
दुसरीकडे पाकिस्तानने 2000 भिकाऱ्यांचे पासपोर्ट ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन ते जगभरात कुठेही जाऊन भीक मागू शकणार नाही. यानुसार सात वर्षांसाठी त्यांचा व्हिसा ब्लॉक असेल.
सौदी अरेबियाने या वर्षाच्या सुरुवातीला फतवा काढला होता. त्यानुसार जर एखादी व्यक्ती परमिटशिवाय हजला आली तर त्याला 2.22 लाखांचा दंड ठोठावला जाईल.