आईसाठी रस्त्यावर भीक मागितली, चहा विकला; नाटक कंपनीत वेटरचं काम केलं; 'या' अभिनेत्याने मराठीच नाही तर बॉलिवूडही गाजवलं

Bollywood Kissa: रस्त्यावर भीक मागणारा एखादा तरुण अभिनेता होऊ शकतो असा विचारही कधी कोणी केला नव्हता. पण तो फक्त साधासुधा नाही तर प्रसिद्ध अभिनेता झाला. त्या अभिनेत्याबद्दल आज जाणून घ्या.   

शिवराज यादव | Updated: Feb 13, 2025, 09:17 PM IST
आईसाठी रस्त्यावर भीक मागितली, चहा विकला; नाटक कंपनीत वेटरचं काम केलं; 'या' अभिनेत्याने मराठीच नाही तर बॉलिवूडही गाजवलं title=

Bollywood Kissa: बॉलिवूड म्हटलं की प्रत्येक चित्रपट चाहत्याला आपण एकदा तरी तिथे नशीब आजमावून पाहावं असं वाटत असतं. स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत दररोज हजारो तरुण-तरुणी आपलं नशीब आजमण्यासाठी येत असतात. पण जर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आलेला एक तरुण अभिनेता झाला तर तुम्हाला किती आश्चर्य वाटेल. आता हे शक्य नाही म्हणत असाल तर बॉलिवूडमध्ये याचं उदाहरण आहे. हा अभिनेता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर दिवंगत अनंत बळवंत धुमाळ आहेत. 13 फेब्रुवारी 1987 रोजी त्यांचं निधन झालं. 

अनंत बळवंत धुमाळ यांनी हावडामध्ये अंकल जॉय, गुमनामध्ये धरमदास, काश्मीर की कलीमध्ये भोलाराम अशा अनेक अजरामर भूमिका निभावल्या. अनंत धुमाळ यांचा जन्म 29 मार्च 1914 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे झाला. लहानपणासून त्यांच्या नशिबात फार कष्ट होते. त्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते फक्त 10 वर्षांचे होते. यामुळे कुटुंबावर फार मोठं संकट आलं आणि त्यांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अनंत धुमाळ यांच्यावर एक वेळ अशी आली होती की, त्यांना आई आणि भावासाठी रस्त्यावर भीक मागावी लागली होती. 

आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनंत धुमाळ शिक्षण घेऊ शकले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी फार कमी वयात त्यांना काम करावं लागलं. परिस्थिती इथवर गेली होती की, त्यांना भीक मागावी लागली. रात्रीच्या वेळी ते चहादेखील विकायचे. पण त्यांच्या नशिबात काहीतरी राखून ठेवलं होतं. धुमाळ थोडे मोठे झाल्यावर एका नाटक कंपनीत सामील झाले. त्या कंपनीत काम करू लागले.

अनंत धुमाळ नाटक कंपनीत वेटरचं काम करत होते. ते सर्वांना जेवण वाढत आणि भांडी घासत. नाटकातील एखादा कलाकार अनुपस्थितीत असेल किंवा आजारी पडला तर अनंत धुमाळ यांनी स्टेजवर बोलावलं जात आहे. त्यामुळे नाटक कंपनीत काम करताना त्यांना अभिनयाच्या संधी मिळू लागल्या. याच काळात नाट्यविश्वातील दिग्गज असणारे प्र .के. अत्रे आणि नानासाहेब फाटक यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांच्यामुळे मोठ्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. लग्नाची बेडी आणि घरा बाहेर या नाटकांमध्ये त्यांना काम केलं. यानंतर त्यांचं नशीब पालटू लागलं. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केलं. 

नंतर बॉलिवूडची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना तिथे काम मिळू लागलं. 1956 मध्ये आलेल्या 'एक शोला' चित्रपटाने त्याचं नशीब पालटलं. 1957 मध्ये आलेल्या अपराधी चित्रपटात त्यांनी बहिऱ्या नोकराची भूमिका निभावली जी खूप गाजली. तुमसे अच्छा कौन है, ब्रह्मचारी, मेरा नाम जोकर, चाचा चौधरी, बंबई का बाबू, कश्मिर की कली, गुमनाम अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

धुमाळ यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, यश मिळाल्यानंतरही ते अहंकारी झाले नाहीत. ते त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी खूप आदराने आणि प्रेमाने बोलत असत. मग तो मोठा सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस. एक काळ असा होता जेव्हा धुमाळ, मेहमूद आणि शुभा खोटे हे त्रिकूट चित्रपटांमध्ये खूप लोकप्रिय होते. चित्रपट मनोरंजक बनवण्यासाठी, अनेक निर्माते-दिग्दर्शक या तिघांना चित्रपटात नक्कीच स्थान देत असत. 

धुमाळ हे चेंबूरला राहायला होते. त्यावेळी मुंबई ते चेंबूर हा प्रवास खूप कठीण असायचा. घरी फोन नसल्याने अनेक निर्मात्यांना त्यांच्याकडे जाता आले नाही. यामुळे अनेक चांगल्या भूमिकेला ते मुकले अशी खंत त्यांच्या मुलीने म्हणजेच हेमा फाटक यांनी सांगितली होती. 13 फेब्रुवारी 1987 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.