Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च दरम्यान खेळवलं जाणार आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानात केलं जाणार असून भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळण्यास तयार नसल्याने या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही तर मग त्यांचे सामने कोणत्या देशात खेळवण्यात येणार याविषयी बरीच चर्चा होती, मात्र आता याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
नवभारतने दिलेल्या वृत्तानुसार पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी आणि यूएईचे वरिष्ठ मंत्री शेख नाहयान अल मुबारक यांची पाकिस्तानात बैठक झाली. शेख नाहयान हे अमीरात क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आहेत. या बैठकीतून समोर आलेल्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचे सर्व सामने हे यूएईतील स्टेडियमवर खेळवले जातील. तसेच भारत - पाकिस्तानात यांच्यातील सामना देखील 23 फेब्रुवारी रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तान शिवाय बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा देखील समावेश असेल. तर 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश तर 2 मार्च रोजी न्यूझीलंड सोबत टीम इंडियाचे सामने होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप आयसीसीने अधिकृतपणे शेड्युल जाहीर केले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात ही 19 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड विरुद्ध यजमान पाकिस्तान यांच्या सामान्यापासून होईल. स्पर्धेतील पहिला सामना हा पाकिस्तानच्या कराचीमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. तर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना हा 27 फेब्रुवारी रोजी रावलपिंडीमध्ये खेळवले जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यातील दुसऱ्या ग्रुपमध्ये अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रीका यांचा समावेश असेल. ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे.
हेही वाचा : चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दोन सेमी फायनल या 4 मार्च आणि 5 मार्च रोजी होणार आहे. यापैकी 4 मार्च रोजी होणाऱ्या सेमी फायनलसाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही तर 5 मार्च रोजी होणाऱ्या सेमी फायनलसाठी रिजर्व डे आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल 9 मार्चला होणार असून यासाठी एक रिजर्व डे ठेवण्यात आलेला आहे. जर भारत सेमी फायनलमध्ये पोहोचला तर पहिला सेमीफायनल सामना हा यूएईमध्ये होईल. जर भारत सेमी फायनलसाठी क्वालिफाय करू शकला नाही तर दोन्ही सेमी फायनल या पाकिस्तानात होतील.