मुंबईकरांनो रविवारी Valentine's Week निमित्त घराबाहेर पडणार असाल तर हे एकदा वाचाच

Mumbaikar Valentine Week Plan Spoil: व्हॅलेंटाइन्स वीक सुरु असल्याने रविवारी जोडादाराबरोबर मुंबईत भटकंतीचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच.

Updated: Feb 8, 2025, 11:10 AM IST
मुंबईकरांनो रविवारी Valentine's Week निमित्त घराबाहेर पडणार असाल तर हे एकदा वाचाच title=
शनिवारपासूनच परिणाम जाणवणार (प्रातिनिधिक फोटो)

Mumbaikar Valentine Week Plan Spoil: मुंबईमधील उपनगरीय लोकल मार्गावरील पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर आज रात्रीपासूनच विशेष मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळेच व्हॅलेंटाइन वीकमधील एकमेव रविवारी व्हॅलेंटाइन सेलिब्रेशनसाठी जोडीदाराबरोबर घराबाहेर पडण्याचा अथवा मुंबईत भटकंतीचा विचार करत असाल तर आधी ट्रेनचं टाइमटेबल पाहूनच घराबाहेर पडणं शहाणपणाचं ठरेल. 

नेमकं काय काम करणार?

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि ग्रांटरोड स्टेशनदरम्यान असलेल्या पूल क्रमांक 5 चे जुने स्टील गर्डर रविवारी बदलण्यात येणार आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेच्या मार्गावर एकूण 13 तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ असलेल्या 1862 साली उभारण्यात आलेल्या जुन्या नाल्यावरील पुलाचे (कल्वर्ट) स्टीलचे गर्डर बदलून त्याजागी सिमेंट कॉंक्रिटचे (आरसीसी) गर्डर उभारण्यात येणार आहेत.

1964 साली स्टील गर्डर लावलेले

मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ असलेल्या या पुलावर 1964 साली स्टीलचे गर्डर उभारण्यात आले होते. त्याजागी आता आरसीसी गर्डर उभारण्यात येणार आहेत. गर्डर उभारण्यात येणार असल्याने या भागातील सर्व 5 मार्गिकांवर 12 मीटर लांबीचे 24 आरसीसी स्लॅब उभारण्यात येणार आहेत. हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून मार्च महिन्यापर्यंत स्टीलचे सर्व गर्डर सिमेंटच्या स्लॅबमध्ये बदलण्यात येणार आहेत. 

नक्की वाचा >> 'त्या' महिला युट्यूबरचे 54 कोटी SEBI कडून जप्त; शेअर मार्केटच्या टीप्स देऊन तिने...

103 फेऱ्या रद्द

शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 या कालावधीत पश्चिम रेल्वेवरी अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकामध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे शनिवारी 31 आणि रविवारी 72 उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉकच्या कालावधीत एकूण 103 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या तीन पुलांचे स्टील गर्डर बदलणार 

पश्चिम रेल्वे मार्गावर असे आणखी 100 वर्षांपेक्षा अधिक जुने तीन पूल असून त्यांचे देखील स्टीलचे गर्डर देखील बदलण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर 100 वर्षांपेक्षा जुने अंधेरी पूल क्रमांक 40, खार सबवे पूल क्रमांक 31 आणि बोरिवली पूल क्रमांक 61 हे  3 पूल असून त्यांचे देखील गार्डर 2025 च्या अखेरपर्यंत बदलण्याचे नियोजित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.