एकच मन कितीदा जिंकणार? कोचला भाड्याचं घर रिकामं करण्याची नोटीस मिळताच नेहरानं जे केलंय ते पाहून हेच म्हणाल...

Ashish Nehra Coach Name : कोचनं केलेले उपकार आशिष कधीच विसरु शकला नाही. म्हणूनच की काय या उपकारांची परतफेड करण्याची संधी मिळताच त्यानं क्षणाचाही विलंब लावला नाही.   

सायली पाटील | Updated: Feb 12, 2025, 11:04 AM IST
एकच मन कितीदा जिंकणार? कोचला भाड्याचं घर रिकामं करण्याची नोटीस मिळताच नेहरानं जे केलंय ते पाहून हेच म्हणाल...  title=
team india cricketer ashish nehra gifts coach tarak sinha a brand new house

Ashish Nehra Coach Name : भारतीय क्रिकेट संघात सध्याच्या घडीला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामागोमाग खेळाडूची एक नवी फळी तयार होत आहे. क्रिकेटसंघात नव्यानं नाव कमवू पाहणारे हे खेळाडू तयार होत असतानाच 90 चं दशक गाजवणाऱ्या खेळाडूंच्या लोकप्रियतेवर मात्र याचा तसुभरही परिणाम झालेला नाही. आशिष नेहरा, अजित आगरकर, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सौरव गांगुली ही आणि अशी अनेक नावं आजही क्रिकेटप्रेमींच्या तोंडी पाहायला मिळतात. 

प्रत्येक खेळाडूचा वेगळा अंदाज, प्रत्येक खेळाडूचा खास स्वभाव. त्यातही आपलं वेगळेपण जपणारं एक नाव म्हणजे आशिष नेहरा. टीम इंडियात आपल्या गोलंदाजीनं एक काळ गाजवणारा आणि हरहुन्नरी स्वभावासाठी ओळखला जाणारा आशिष नेहरा आजही अगदी तसाच आहे, सच्चा मनाचा! 

नेहराची एक कृती पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकत असून, आजही त्याला क्रिकेटप्रेमींचं इतकं प्रेम का मिळतं हे सिद्ध झालं आहे. प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक पद्मजीत सेहरावत यांनी हल्लीच एका पॉडकास्टदरम्यान नेहराच्या या कृतीविषयी सांगत एक आठवण सर्वांसमोर मांडली. भारतीय संघातील या वेगवान गोलंदाजानं कशा प्रकारे आपल्या बालपणीच्या प्रशिक्षकांना त्यांच्या पडत्या काळात आधार दिल्याचं या पॉडकास्टदरम्यान समोर आलं. 

एकेकाळी तारक सिन्हा हे नेहराचे प्रशिक्षक होते. त्याच्याव्यरिक्त आकाश चोप्रा, शिखर धवन, ऋषभ पंत, मनोज प्रभाकर, अंजुम चोप्रा असे एकाहून एक सरस खेळाडू त्यांनी तयार केले. 2021 मध्ये सिन्हा यांनी जगाचा निरोप घेतला. याच सिन्हा यांच्या पडत्या काळात आशिष नेहरानं त्यांना हक्कानं आधार दिला. तिच आठवण सांगत सिन्हा यांनी काही गोष्टी सर्वांपुढं आणल्या. 

'आशिष नेहरानं कोणाला कळूही न देता आपल्या प्रशिक्षकांना मदत केली होती. एकदा नेहरा सोननेट क्रिकेट क्लबमध्ये कोचिंग घेत होता. तेव्हा तिथं प्रशिक्षक सिन्हा काहीसे उशिरानं पोहोचले. त्यांना पाहून, नेहरानं थट्टा करत म्हटलं, तुम्हीच उशीरा आलात तर, विद्यार्थ्यांना कसं शिकवाल?' नेहराच्या या वक्तव्यावर उत्तर देत सिन्हा म्हणाले, 'तुम्ही क्रिकेटर आहात. बंगल्यात राहता आणि  मी भाड्याच्या घरात. मला घरमालकानं घर रिकामं करण्याची नोटीस बजावलीये. नवं घर शोधायला गेलेलो मी म्हणूनच उशीर झाला.'

हेसुद्धा वाचा : चांगलं काम करणाऱ्यांनाही काढा... 164,500,000,000 ची उलाढाल असणाऱ्या कंपनीचा धक्कादायक निर्णय 

पदम यांच्या माहितीनुसार त्या थट्टामस्करीनंतर पुढील दोन दिवस पावसामुळं प्रशिक्षण कॅम्प बंद होता आणि तिसऱ्या दिवशी नेहरा तिथं तीन तास उशीरा पोहोचला. तेव्हा प्रशिक्षकांनीही थट्टेचा सूर आळवत 'टेस्टपटू...तेव्हा मला हुशारी शिकवत होतास, आज काय झालं?' असं म्हटलं. नेहरानं ऐकलं आणि सिन्हांच्या हातात एका घराची चावी दिली आणि म्हणाला, 'ज्याचे गुरू भाड्याच्या घरात राहतात त्याला घर शोधण्यासाठी तीन दिवस लागतीलच ना... ही घ्या तुमच्या नव्या घराची चावी. तिथं काम सुरुय, 10 दिवसांनी तुम्ही तिथं राहायला जाऊ शकता.'

आपल्या गुरुप्रती आशिष नेहरानं दाखवलेल्या या कृतज्ञतेच्या भावनेनं तिथं असणारे सारे हैराण झाले. नकळत नेहरानं त्याच्या वागण्यातून इतरांनाही खूप काही शिकवलं होतं असं म्हणायला हरकत नाही.