Viral Video: जंगलात शिकार करताना अनेकद प्राण्यांची फसगत होते. पण त्यानंतर जे घडतं ते अनेकदा पाहणं आश्चर्यकारक असतं. मध्य प्रदेशातील सिवनी येथील पेंच नॅशनल पार्क येथे एका वाघिणीने शिकारीचा पाठलाग केला. पण यावेळी अंदाज चुकल्याने वाघीण आणि रानडुक्कर चुकून विहिरीत पडले अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
जिकुराई वनपरिक्षेत्रातील पिपरिया हरदुली गावात मंगळवारी सकाळी ग्रामस्थ विहिरीतून पाणी आणण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. रिझर्व्हचे उपसंचालक रजनीश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षं वयाची वाघीण डुकराचा पाठलाग करत असताना ते दोघेही विहिरीत सापडले.
विहिरीत पडल्यानंतर वाघीण आणि डुक्कर दोघेही शिकार विसरले. विहिरीतून सुखरुप बाहेर पडण्यासाठी दोघेही वाट पाहत बसले. यादरम्यान अनेकदा दोघं एकमेकांच्या सहाय्याने आराम करतानाही दिसले. संकटाच्या काळात जणू काही त्यांना एकमेकांची साथ होती. रजनीश कुमार सिंह यांनी सांगितलं की, एकूण चार तास हे ऑपरेशन सुरु होतं. दरम्यान विहिरीत वाघीण आणि डुक्करातील मैत्री पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
A tiger and a boar ccidentally fell into a well in Pipariya village near the reaserve. Thanks to the swift action of the Pench Tiger Reserve rescue team, big cat and boar were safely rescued! With expert coordination & care, both animals were pulled out unharmed and released back pic.twitter.com/s8lRZH8mN5
— Pench Tiger Reserve (@PenchMP) February 4, 2025
दोरीच्या साहाय्याने एक खाट विहिरीत उतरवली असता त्यावर वाघिणी बसली. एका बचाव पथकाने हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा टाकला आणि वाघिणीला सुरक्षितपणे पकडलं, असं अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. रानडुकराचीही अशाच प्रकारे सुटका केल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं.
दोन्ही वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी सुमारे 60 बचावकर्ते सहभागी झाले होते अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. मुख्य वन्यजीव संरक्षकांनी या वाघिणीला सागर जिल्ह्यातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पांतर्गत नौरादेही वन्यजीव अभयारण्यात सोडण्याचे निर्देश दिले आहेत.