बेवारस इनोव्हा, 53 किलो सोनं, 11 कोटी रोख अन् जंगल; काय आहे मध्यरात्रीचं नेमकं रहस्य; समजून घ्या

मध्य प्रदेश परिवहन विभागातील माजी हवालदार सौरभ शर्मा अनेक यंत्रणांकडून सुरु असलेल्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहेत.  

शिवराज यादव | Updated: Feb 5, 2025, 04:11 PM IST
बेवारस इनोव्हा, 53 किलो सोनं, 11 कोटी रोख अन् जंगल; काय आहे मध्यरात्रीचं नेमकं रहस्य; समजून घ्या title=

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गेल्या काही वर्षात भ्रष्टाचारासंबंधी अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका बेवारस कारमध्ये 52 किलो सोनं आणि 11 कोटींची रोख रक्कम सापडली होती. यानंतर ही कार नेमकी कोणाची आहे याबद्दल तपास सुरु झाला होता. मध्य प्रदेश परिवहन विभागातील माजी हवालदार सौरभ शर्मा अंमलबजावणी संचालनालय (ED), प्राप्तिकर विभाग (IT), महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि लोकायुक्त पोलीस यांचा समावेश असलेल्या अनेक यंत्रणांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.

सौरभ शर्माच्या पतनाची सुरुवात डिसेंबर 2024 च्या छाप्यापासून झाली ज्यामध्ये रोख, दागिने आणि मालमत्तेच्या कागदपत्रांसह सुमारे 8 कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली होती. त्यानंतर भोपाळजवळील मेंदोरी जंगलात सोडलेल्या पांढऱ्या टोयोटा इनोव्हामध्ये 52 किलो सोने आणि 11 कोटी रुपये रोख असल्याचे आढळून आले.

एका अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीतून सुरू झालेल्या भ्रष्टाचाराचे जाळे आता मध्य प्रदेशातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि रिअल इस्टेट व्यवहारात गुंतलेले आहे.

कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनी संभ्रमात भर टाकली असून, लोकायुक्तांनी जप्त केलेल्या मालमत्तेच्या अहवालात मोठी तफावत उघड केली आहे. सुरुवातीच्या दाव्यांनुसार 7.98 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते, परंतु डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने नंतर सांगितले की जप्ती केवळ 55 लाख रुपये, दागिने आणि चांदीसह होती.

या विसंगतींमुळे भ्रष्टाचार विरोधी संस्थेच्या चौकशीत निष्काळजीपणा  किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली का? अशी शंका निर्माण होत आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत संभाव्य उल्लंघनाचा हवाला देत ईडीने तपासाचे प्रमुख पैलू ताब्यात घेतले आहेत.

'गोल्डन कार'चा मालक बेपत्ता

अनेक यंत्रणा एकत्रित तपास करत असतानाही बेवारसपणे सोडून देण्यात आलेल्या पैसे, सोन्यावर दावा करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. शर्मा यांचे जवळचे सहकारी चेतन सिंग गौर यांच्याकडे कारची नोंदणी करण्यात आली होती, परंतु गौर यांनी यात सहभाग नाकारला आहे. त्यांनी वाहन फक्त एका ड्रायव्हरला दिले होते असं सांगितलं आहे, ज्याची अद्याप ओळख पटलेली नाही

छाप्याच्या रात्री शर्मा यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार कैद झाली. तरीही, लोकायुक्त हे वाहन रोखण्यात अयशस्वी ठरले आणि नंतर ते सोडून दिले. यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की आतील लोकांनी मुख्य संशयितांना सूचित केले असावे, ज्यामुळे त्यांना पुरावे दुसरीकडे नेण्याची संधी मिळाली असावी. 

तपास आता मध्य प्रदेशच्या पलीकडे विस्तारला आहे. यंत्रणा अवैध सोन्याच्या तस्करीच्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहेत. शर्माच्या आर्थिक व्यवहारातून दुबई, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियाशी संबंध असल्याचे दिसून येते. ज्यामधून 100 कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आले असून, 52 जिल्ह्यांतील परिवहन अधिकारी गुंतले आहेत.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात, त्यांनी हे प्रकऱण ज्या प्रकारे हाताळलं जात आहे त्यावर टीका केली आणि ईडी आणि आयटी विभागाच्या तपासावर विशेष नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.

प्रत्युत्तरात मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या प्रशासनाचा बचाव करताना सांगितलं की, "आमच्या सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध नेहमीच तत्त्वनिष्ठ लढाई लढली आहे. आम्ही तपासातील अडथळेही बंद केले आहेत. आम्ही प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध आहोत." सध्या सौरभ शर्मा आणि त्याचे सहकारी चेतन गौर आणि शरद जैस्वाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत. परंतु हे सोनं आणि रोख रक्कम कोणाची आहे हे उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे.