सौरव गांगुली नाराज, बीसीसीआयला लिहिलं पत्र

सौरव गांगुलीनं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डला राहुल जोहरीप्रकरणी खरमरीत पत्र लिहीलंय.

Updated: Oct 30, 2018, 09:46 PM IST
सौरव गांगुली नाराज, बीसीसीआयला लिहिलं पत्र title=

कोलकाता : सौरव गांगुलीनं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डला राहुल जोहरीप्रकरणी खरमरीत पत्र लिहीलंय. राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं व्यवस्थित हाताळलं नसल्याची टीका त्यानं केलीय. त्याचप्रमाणे यामुळे बीसीसीआयची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन झाल्याचंही त्यानं या पत्रात म्हटलंय. या पत्रामध्ये सौरव गांगुलीनं राहुल जोहरी यांचं थेट नाव घेणं टाळलं आहे.

लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे मला माहिती नाही. पण या आरोपांमुळे मी चिंतित झालो आहे. याप्रकरणी बीसीसीआयनं केलेली कारवाई कमजोर आहे. त्यापेक्षा या प्रकरणाला ज्या पद्धतीनं हाताळण्यात आलं ते जास्त चिंताजनक आहे, असं गांगुली या पत्रात म्हणाला आहे.

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर महिला पत्रकारांनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेखिका हरनिध कौर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या पत्रकाराचं नाव उघड न करता याबाबत वाचा फोडली आहे. नोकरीचं आश्वासन देऊन जोहरी यांनी या पत्रकाराचं शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय.