Yuvraj Singh on MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि माजी अनुभवी अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यांच्यातील कथित वादावरुन सातत्याने चर्चा होत असते. सुरुवातीच्या काळात टीम इंडियाचा अष्टपैलू युवराज सिंग धोनीला खूप चिडायचा असेही म्हटलं जायचं. पण त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली होती. पण आता एका मुलाखतीमध्ये युवराजने धोनीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.
युवराज सिंगने एका मुलाखतीत महेंद्रसिंह धोनीसोबतच्या मैत्रीबाबत धक्कादायक विधान केले आहे. माझ्यात आणि धोनीमध्ये कधीच घट्ट मैत्री नव्हती असे त्याने म्हटले आहे. मी आणि धोनी मित्र होते कारण आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो. पण आम्ही कधीच जवळचे मित्र नव्हतो, असेही युवराजने म्हटलं आहे. या मुलाखतीमध्ये युवराजने धोनीसोबत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत घालवलेल्या प्रदीर्घ काळाबद्दल सविस्तर भाष्य केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने माजी कर्णधार एमएस धोनीबाबत वक्तव्य केल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. युवराज म्हणाला की एमएस धोनी त्याचा फार चांगला मित्र नव्हता. युवराजने युट्युब चॅनलवरील कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले. याशिवाय त्याने धोनीबद्दलही अनेक गोष्टी बोलल्या आहेत.
प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी
या युट्युब शोमध्ये युवराजला धोनीसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यानंतर युवराज म्हणाला, तू हे का विचारत आहेस? मात्र, आग्रह केल्यानंतर त्याने माही आणि मी चांगले मित्र नसल्याचे सांगितले. माही आणि मी जवळचे मित्र नाही. आम्ही मित्र होतो कारण आम्ही एकत्र क्रिकेट खेळायचो. पण माही आणि माझी जीवनशैली खूप वेगळी होती. त्यामुळे आमच्यात घट्ट मैत्री झाली नाही. मैदानाबाहेर तुमचे सहकारी तुमचे चांगले मित्र असतीलच असे नाही. प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. कोणत्याही एका संघाकडे पहा, सर्व 11 खेळाडू एकत्र फिरणार नाहीत, असे युवराजने म्हटलं आहे.
आमच्यात मतभेद होते
"मी आणि माही जेव्हा मैदानात उतरायचो तेव्हा आम्ही दोघेही देशासाठी 100 टक्के द्यायचो. तो कर्णधार आणि मी उपकर्णधार. आमच्या निर्णयांमध्ये मतभेद असायचे. त्याचे काही निर्णय असे होते की मला आवडले नाही आणि माझे काही निर्णय त्याच्या समजण्याच्या पलीकडे होते. हे प्रत्येक संघासोबत घडते. या काळात आम्ही एकमेकांना मदत देखील केली. एकदा धोनीला शतक पूर्ण करण्यात मदत केली होती. धोनीनेही एकदा त्याचे अर्धशतक पूर्ण करताना मला साथ दिली होती," असेही युवराज म्हणाला.
धोनीने चित्र स्पष्ट केलं
"जेव्हा माझी कारकीर्द संपणार होती तेव्हा मला समजत नव्हते की काय करावे. 2019 च्या विश्वचषकात धोनीनेच मला सांगितले की निवड समिती तुझी निवड करणार नाही. मग मी म्हणालो, निदान मला कोणीतरी माझ्यासमोर चित्र स्पष्ट केले. एकदा धोनीला दुखापत झाली आणि तो बांगलादेशविरुद्ध खेळत होता. मग मी त्याच्यासाठी धावपटू म्हणून काम केले. मला आठवते की तो 90 च्या आसपास होता आणि त्याने त्याचे शतक पूर्ण करावे असा मी विचार करत होतो. त्याच्या शतकासाठी मी दोन धावा केल्या. त्यानंतर विश्वचषकात मी 48 धावांवर होतो आणि त्यानंतर धोनीने माझे अर्धशतक पूर्ण केले," असे युवराज म्हणाला.
काही खेळाडू मला आवडत नाहीत
पुढे बोलताना युवराज म्हणाला की, 'मला आठवतंय की विश्वचषकाच्या फायनलमध्ये गौतम गंभीर बाद झाल्यानंतर मी मैदानात गेलो होतो, कारण मी लेफ्टी आहे. त्यानंतर विराट बाद झाला, त्यामुळे धोनी स्वत: आला आणि तो योग्य निर्णय होता. कारण दोन्ही बाजूंनी फिरकीपटू होते. त्यामुळे संघासाठी हा चांगला निर्णय होता. मैत्रीपेक्षा संघासाठी खेळणे महत्त्वाचे आहे. तो माझ्यासाठी शुभेच्छा देत असेल आणि मी त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. धोनी आणि मी दोघेही निवृत्त झालो आहोत आणि आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा मित्रांसारखे भेटतो. अंडर-16 पासून मी भज्जीसोबत खेळलो आहे. भारताकडून खेळण्यापूर्वी मी झहीर, आशिष आणि हरभजन यांना भेटलो होतो. ज्यांना मी भारतासाठी खेळल्यानंतर भेटलो त्यापैकी काही चांगले आहेत, काही नाहीत आणि काही खूप चांगले आहेत. असे एक किंवा दोन खेळाडू आहेत जे मला आवडत नाहीत आणि त्यांची नावे मी येथे घेणार नाही.'