IND VS ENG 2nd ODI : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात रविवारी ओडिशा येथील कटक स्टेडियमवर वनडे सीरिजचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने 4 विकेट्सने इंग्लंडवर विजय मिळवून 2-0 ने सीरिजमध्ये विजयी आघाडी सुद्धा घेतली. यात टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही जबरदस्त परफॉर्म केलं. परंतु या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मैदानावर असं काही घडलं ज्यामुळे जगात भारताची नाचक्की झाली.
कटकच्या बाराबाती स्टेडियमवर फ्लडलाईट्स खराब झाल्यामुळे मैदानावर अंधार पसरला होता. यावेळी भारत सामना जिंकण्यासाठी 305 धावांचा पाठलाग करत होता, त्यावेळी स्कोअर हा शुन्य विकेटवर 48 धावा असा होता. तेव्हा ‘क्लॉक टॉवर’ जवळ असणाऱ्या आठ फ्लडलाईट्समधून एक फेल झाली. ज्यामुळे ती दुरुस्त होईपर्यंत सामना जवळपास 35 मिनिटं थांबवावा लागला. ज्यामुळे खेळाडूंना मैदाना बाहेर जावे लागले. सध्या या घटनेवरून वादविवाद सुरु आहेत.
सामना सुरु असताना अचानक फ्लडलाईट्स खराब झाल्यामुळे या मुद्द्याला घेऊन ओडिशा सरकार आता कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ओडिशा सरकारमधील खेळ मंत्री सूरज सूर्यवंशी हे सामना संपल्यावर म्हणाले की, याबाबतीत आम्ही ओडिशा क्रिकेट असोसिएशनसोबत बोलू. या सामन्यादरम्यान मुख्यमंत्री मोहन चरण आणि इतर मंत्री सुद्धा उपस्थित होते.
हेही वाचा : 'हे शतक...', नवऱ्याच्या शतकानंतर रोहितच्या बायकोची इमोशनल Insta स्टोरी; स्क्रीनशॉट पाहाच
सूरज सूर्यवंशी यांनी सांगितले की, 'फ्लडलाईट्स प्रकरणाबाबत आम्ही ओसीएकडून स्पष्टीकरण मागणार आहोत. ओसीएने सर्व खबरदारी आणि तयारी केल्या असताना सुद्धा अशी घटना घडली. ओसीए सचिव संजय बेहरा यांनी पत्रकारांना सांगितले की, "प्रत्येक फ्लडलाईट टॉवरला दोन जनरेटर जोडले गेले होते. जेव्हा जनरेटर एक खराब झाला तेव्हा आम्ही दुसरा जनरेटर चालू केला. परंतु जनरेटर हटवण्यात थोडा वेळ लागला कारण खेळाडूंची बस ही टॉवर आणि दुसरा जनरेटर यांच्या मध्ये उभी होती'.
दरम्यान, स्टेडियममध्ये उपस्थित कॉंग्रेसचे आमदार सोफिया फिरदॉस यांनी फ्लडलाईट्समुळे सामन्यात आलेल्या अडथळ्याचा निषेध केला. ते म्हणाले, 'आज बाराबाती स्टेडियममध्ये जे घडले ते खूप दुर्दैवी आहे. त्याची तपासणी योग्य प्रकारे केली पाहिजे'.
रोहित शर्माने 76 चेंडूत शतक ठोकले. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माने शानदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त 76 चेंडूत त्याचे 32 वे शतक पूर्ण केले. याआधी तो खराब फॉर्ममध्ये दिसला होता. 13 एकदिवसीय डावांनंतर शतक ठोकून हिटमनने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.