ICC World Cup 2023 Indian Players: भारतासाठी घरगुती मैदानांवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणारा एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा अंत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघाला 2011 सालापासून विश्वचषक स्पर्धा जिंकता आलेली नाही. असं असताना यंदा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जीव ओतून मैदानात खेळेल यात कोणत्याही भारतीय क्रिकेट चाहत्याला शंका नाही. विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघ 30 ऑगस्टपासून आशिया चषकामध्ये खेळणार आहे. या स्पर्धेमध्ये 2 सप्टेंबर रोजी भारतीय संघ पाकिस्तानच्या संघाविरोधात मैदानात उतरणार आहे. याशिवाय श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघांविरोधातही रोहितच्या संघाची परीक्षा असणार आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. हे सर्वच संघ विश्वचषक स्पर्धेतही खेळणार असल्याने आशिया चषकही भारतासाठी लिटमस टेस्टप्रमाणे असेल असं म्हटलं जात आहे. मागील आशिया चषक स्पर्धेत भारताला अंतिम 2 संघांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आलेलं.
विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना आशिया चषक स्पर्धेत स्थान मिळेल असं मानलं जात आहे. आशिया चषकाच्या माध्यमातून निवड समितीलाही विश्वचषक स्पर्धेसाठी कोणाला संघात ठेवायचं आणि कोणाला नाही याबद्दलची अधिक स्पष्टता येईल. मागील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर 7 अशा खेळाडूंना यंदा संधी मिळणार नाही जे मागील विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या संघाचा भाग होते. यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसहीत 3 विकेटकीपर्सचा समावेश आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ऋषभ पंत हा जायबंदी असून डिसेंबर महिन्यापासून ते मैदानात उतरलेला नाही. दिनेश कार्तिक तर संभाव्य खेळाडूंच्या यादीतही नाही यांच्याबद्दल चर्चा होत आहे. विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे.
शिखर धवन 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील 2 सामने खेळला होता. त्याने एक शतक झळकावत या दोन्ही सामन्यांमध्ये मिळून 125 धावा केलेल्या. मात्र नंतर अंगठ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. याशिवाय केदार जाधवने 5 डावांमध्ये 80, विजय शंकरने 3 डावांमध्ये 58 धावा केल्या होत्या. तसेच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 6 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. हे चारही खेळाडू सध्याच्या विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर असल्याचं जवळजवळ निश्चित आहे. धोनीने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 8 डावांमध्ये 273 धावा केल्या होत्या. तर पंतने 4 डावांमध्ये 116 धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिकने 2 सामन्यांमध्ये 14 धावा केलेल्या.
रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करत आहे. मागील विश्वचषक स्पर्धा भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. उपांत्यफेरीमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यानचा अंतिम सामना बरोबबरीत सुटल्यानंतर सर्वाधिक चौकार लगावणारा संघ म्हणून इंग्लंडला जेतेपद देण्यात आलं होतं. या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने दमदार कामगिरी केली होती. त्याने 9 डावांमध्ये 5 शतकं आणि एका अर्धशतकाच्या जोरावर सर्वाधिक 648 धावा केल्या होत्या. त्याची सरासरी 81 इतकी होती. अशीच कामगिरी तो आता घरच्या मैदानावर करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.