www.24taas.com, मुंबई
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन जेडीयु आणि भाजपमध्ये बिनसलं असतानाच, शिवसेनेनंही यावरुन भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन भाजपात गोंधळ सुरु असला तरी एनडीएच पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवेल, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. एखाद्याच्या उमेदवारीने ५-१० जागांचा फाय़दा होऊ शकेल, मात्र मित्रपक्ष दूर गेल्यास जास्त तोटा होईल, अशी भूमिकाही शिवसेनेनं घेत नरेंद्र मोदींच्या नावालाही अप्रत्यक्ष विरोध असल्याचे संकेत दिलेयत.
जेडीयुपाठोपाठ शिवसेनेनंही भाजपवर नाराजी व्यक्त केल्यानंतर, २० एप्रिलला एनडीएची बैठक होणार आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी ही बैठक होणार आहे.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसह अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. २०१४च्या निवडणुकांपूर्वी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार नाही अशी भाजची भूमिका आहे.
दरम्यान, पंतप्रधानपदाबाबत ‘यूपीए’चे लोक एकाच सुरात बोलत आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठांत दुसरेच असेलही, पण हे सर्व आज तरी मनमोहन बाहुल्याच्या मागे उभे आहेत. मात्र ‘एनडीए’त जो तो स्वत:च स्वतंत्र झांज, चिपळ्या, मृदंग वाजवून लोकांच्या कानाचे पडदे फाडीत आहे. हे चित्र चांगले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादीकयमध्ये म्हटले आहे.