मुंबई : गेल्या आठवड्यात विधानसभेत राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या आमदारांना क्लीन चीट देण्यात आलीय.
४ एप्रिल रोजी सभागृहात राष्ट्रध्वज फडकावून विरोधी पक्षाच्या आमदारांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. यावर मोठा गदारोळही माजला होता.
या घटनेत, जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा कुणाचा हेतू नव्हता, असं सांगत चित्रफित आणि ध्वज संहितेच्या तपासणीनंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी हा निर्णय दिलाय. मात्र, यापुढे राष्ट्रध्वज सभागृहात आणून फडकवू नये, अशी तंबीही अध्यक्षांनी दिलीय.
विधानसभेत आतापर्यंत राष्ट्रध्वज आणून फडकवला नव्हता, ही पहिली आणि शेवटची घटना ठरावी, अशी अपेक्षा यावेळी बागडेंनी व्यक्त केलीय.
गेल्या सोमवारी विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी झेंडा उलटा फडकावला होता. यावरून अध्यक्षांनी व्हिडिओ फुटेज पाहून या प्रकरणावर निर्णय देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच भाजपचे आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तिरंग्यानं चेहरा पुसल्याचा गंभीर आरोप केला होता.