मुंबईहून सागर कुलकर्णी : युती तुटल्यावर आता शिवसेना भाजपने एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला सुरूवात केलीय. मुंबईत भाजपने पारदर्शी कारभारावरून शिवसेनाला घेरल्यावर शिवसेनेनं भाजपच्या ताब्यातल्या नागपूर महापालिकेवरून भाजपवर टीकास्त्र सोडलं.
भाजपने युतीची बोलणी सुरू झाल्यापासूनच मुंबई महापालिकेतल्या पारदर्शी कारभाराचा मुद्दा कायम जागता ठेवला. त्यावरून तिळपापड झालेल्या शिवसेनेनं अखेर युतीच तोडून टाकली. भाजपच्या किरीट सोमय्या, आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप करत शिवसेनेला नेहमीच घेरण्याचा प्रयत्न केला. आता भाजपचं पारदर्शी कारभाराचं अस्त्र भाजपच्याच घशात घालण्याचा शिवसेनेनं प्रयत्न सुरू केलाय. नागपूर महापालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं जोरदार आरोप केले.
नागपूर मनपा सिमेंट गैरकारभाराबाबत वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत उत्तर का आलं नाही असा सवाल शिवसेनेनं केलाय. रस्ता, खड्डे या मुद्द्यावरून चौकशीची मागणी शिवसेनेनं केलीय. नागपूरला पाणीपुरवठा करणारी ओसीडब्ल्यू कंपनीला कोणी काम दिलं, ही कंपनी कुणाची आहे, पाणीपट्टी वाढली पण 24 तास पाणी झालंच नाही अशा आरोपांची सरबत्तीच शिवसेनेने केलीय..
शिवसेनेच्या या आरोपांना नागपूर महापालिकेच्या महापौरांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय. ओसीडब्ल्यू कंपनीशी करार झाला तेव्हा शिवसेनेचा उपमहापौर होता. त्यामुळे तेव्हा शिवसेना मूग गिळून गप्प का होती असा सवाल महापौर प्रवीण दटके यांनी केलाय. मुंबईत पारदर्शी कारभार नाही म्हणून नागपूरवर आरोप होत असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
शिवसेना भाजप हे राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले पक्ष आता महापालिका निवडणुकात एकमेकांवर कुरघोडी करण्याची, आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. येत्या काळात या दोन्ही पक्षातला हा रणसंग्राम अधिकाधीक गंभीर होत जाणार हे नक्की