राज ठाकरेंचे इंजिन सध्या भरकटलंय....

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. मनसेकडूनच त्याला खतपाणी घातलं जातंय... मनसेवर ही वेळ का आली? आणि उद्धव ठाकरेंनी त्याला काय प्रतिसाद दिला? 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 30, 2017, 08:25 PM IST
राज ठाकरेंचे इंजिन सध्या भरकटलंय.... title=

 मुंबई : शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. मनसेकडूनच त्याला खतपाणी घातलं जातंय... मनसेवर ही वेळ का आली? आणि उद्धव ठाकरेंनी त्याला काय प्रतिसाद दिला? 
 
 राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात... याचाच दाहक अनुभव सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतायत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाल्यानंतर राज ठाकरेंनी छद्मीपणानं सुपरहिट डायलॉग ऐकवला होता...

त्यावेळी राज ठाकरेंची आणि मनसेची हवा होती. हवेची दिशा ओळखूनच उद्धव ठाकरेंनी राज यांच्यापुढं टाळीसाठी मैत्रीचा हात देखील पुढं केला. पण राज ठाकरेंनी टाळी द्यायला साफ नकार दिला.

पण म्हणतात ना... मौका सभी को मिलता है... राज ठाकरेंचं इंजिन सध्या असं काही भरकटलंय की, कोणत्या दिशेला जावं, तेच कळत नाहीय... महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंकडं ना मुद्दा आहे, ना नगरसेवक... त्यामुळंच शिवसेनेशी जुळवून घेण्याची वेळ मनसेवर आलीय.

शिवसेना-मनसे युतीसाठी राज ठाकरेंनी स्वतः 6 वेळा उद्धवना फोन केल्याचं समजतंय... मात्र उद्धव ठाकरेंनी फोन उचललेच नाहीत... युतीचा प्रस्ताव देऊन राज ठाकरेंचे दूत बाळा नांदगावकर थेट मातोश्रीवर पोहोचले.... पण शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीच. आता तर शिवसेना एकटीच पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

एकेकाळी फॉर्मात असलेली मनसे सध्या राजकारणातला बॅड पॅच अनुभवतेय. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंना आपला पक्ष टिकवण्यासाठी शिवसेनेपुढंच हात पसरण्याची वेळ आलीय. आता शिवसेनेनं युतीचा प्रस्ताव फेटाळल्यानं मनसेचं इंजिन कोणत्या दिशेनं जाणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.