आडरस्त्यात नाही तर परळीच्या कोर्टासमोर झाला महादेव मुंडेंचा खून; 458 दिवसानंतर सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप

 महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी देखील केला आहे.

वनिता कांबळे | Updated: Jan 22, 2025, 11:17 PM IST
आडरस्त्यात नाही तर परळीच्या कोर्टासमोर झाला महादेव मुंडेंचा खून; 458 दिवसानंतर सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप title=

Suresh Dhas :परळीत गेल्या वीस वर्षांत अनेक राजकीय खून झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. सव्वा वर्षापूर्वी महादेव मुंडे या राजकीय कार्यकर्त्याचा खून झाला. परळीच्या कोर्टासमोर झालेल्या या खुनाचा तपासही झाला नाही. न्यायासाठी महादेवच्या कुटुंबाची वणवण सुरु आहे. सुरेश धस यांनी आवाज उठवल्यानंतर आता या प्रकरणात न्याय मिळणार अशी आशा पल्लवीत झालीये.

महादेव मुंडेंचा बरोबर सव्वा वर्षापूर्वी म्हणजे 21 ऑक्टोबर 2023 रोजी खून झाला. हा खून कुठं आडरस्त्याला झाला नाही... त्यांचा मुडदा पाडला गेला परळीच्या कोर्टासमोर आणि वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात... महादेव मुंडे हे व्यापारी होते. पण त्याचा खून राजकीय असल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय. महादेव मुंडेंसारख्या अनेकांचा परळीत खून करण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय.

महादेव मुंडे हे परळीतील व्यावसायिक होते.  परळी तालुक्यातील भोपला हे महादेव यांचं मूळ गाव आहे.  22 ऑक्टोबर 2023ला महादेव यांची हत्या झाली.  परळीतील वनविभागाच्या कार्यालयासमोरील आवारात मृतदेह आढळला.  महादेव यांची हत्या राजकीय हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  सुरेश धसांनी केलेल्या आरोपानंतर महादेव मुंडेंचे कुटुंबही पुढं आलंय. महादेव मुंडेंच्या कुटुंबानं या प्रकरणी पोलिसांकडं पाठपुरावा करुनही मुंडे कुटुंबाचा अक्षरक्षः फुटबॉल केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

महादेव मुंडे कुटुंबानं या प्रकरणी कोर्टातही धाव घेतली. या प्रकरणाच्या तपासासाठी कोर्टात याचिकाही दाखल केली. आता सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी आवाज उठवल्यानं त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल असं वाटू लागलंय. महादेव मुंडे यांच्याप्रमाणं परळीत अनेकांचे राजकीय खून झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. महादेव मुंडेंप्रमाणे त्या खुनांच्या फाईल्सही पुन्हा उघडल्या जाव्या अशी मागणी आता जोर धरु लागलीये.