'हे प्रेमानंद आहेत आणि...', महाकुंभमेळ्यात अरब शेख बनून पोहोचला कंटेंट क्रिएटर; लोकांनी घडवली जन्माची अद्दल

Viral Video: महाकुंभमेळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण अरबचा शेख असल्याचं भासवत तसा पोषाख करुन फिरत होता. पण त्याला हा स्टंट फारच महागात पडला.   

शिवराज यादव | Updated: Jan 22, 2025, 09:38 PM IST
'हे प्रेमानंद आहेत आणि...', महाकुंभमेळ्यात अरब शेख बनून पोहोचला कंटेंट क्रिएटर; लोकांनी घडवली जन्माची अद्दल title=

Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात रोज लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. याशिवाय अनेकजण महाकुंभमध्ये पोहोचण्यासाठी निघाले असून, प्रवासात आहेत. एकीकडे अनेकजण श्रद्धा, भक्तीने महाकुंभमेळ्याच्या दिशेने जात असताना, यामध्ये काहीजण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या हेतूने पोहोचत आहेत. एखादी रील बनवून आपणही प्रसिद्ध व्हावं अशी त्यांची आशा असते. पण काही लाईक्स आणि कमेंट्सच्या नादात आपण पायरी ओलांडत असल्याचं त्यांच्या लक्षात येत नाही, ज्याची किंमतही त्यांना मोजावी लागते. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथे एका तरुणाला अरब शेखचा पोषाख करणं महागात पडलं आहे. लोकांनी त्याला पळवून पळवून धुलाई केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत दिसत आहे की, एक व्यक्ती महाकुंभमेळ्यात अरब शेखसारखा पोषाख करुन फिरत होता. त्याने अरब शेखप्रमाणे सफेद कपडे आणि डोळ्यावर काळा चष्मा घातला होता. हे कपडे घालून तो तोऱ्यात चालत होता. यावेळी त्याच्यासह इतर तरुणही दिसत आहेत. 

त्याच्यासह असणारे तरुण जणू काही आपण त्याचे सुरक्षारक्षक आहोत असं वागत असतात. यादरम्यान, जेव्हा एका व्यक्तीने त्या तरुणाचे नाव विचारले तेव्हा शेखच्या पोशाखात असलेल्या तरुणाऐवजी त्याच्यासोबत चालणारा तरुण उत्तर देतो. तो सांगतो की शेखचे नाव प्रेमानंद आहे आणि तो राजस्थानचा आहे.

यानंतरच्या व्हिडीओत काही लोकांची गर्दी आणि गोंधळ दिसत आहे. नंतर दिसत आहे की ही गर्दी अरब शेखचा पोषाख केलेल्या तरुणाला मारहाण करत आहेत. सर्वांनी त्याला घेरल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावेळी त्याच्या डोक्यावरची टोपीही गायब झालेली आहे. हे सर्व त्याला मारहाण करत असतात. मारहाण करणाऱ्यांमध्ये साधूही दिसत आहेत.