राजचे मनसैनिक मुंबईत लढवणार सर्व जागा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे २२७ जागा लढवण्याचे निश्‍चित केल्याची सुत्रांकडून समजते. त्यामुळे आता कोणाला उमेदवार याकडे लक्ष लागले. कारण उमेदवारांची यादी २० जानेवारीला प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. सर्व जागा मनसे लढवणार असल्याने किती जागा पदरात पडतात आणि सत्ता काबीज करणार का, याचीच चर्चा आहे.

Updated: Jan 10, 2012, 09:54 AM IST

www.24taas.com , मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे २२७ जागा लढवण्याचे निश्‍चित केल्याची सुत्रांकडून समजते. त्यामुळे आता कोणाला उमेदवार याकडे लक्ष लागले. कारण उमेदवारांची यादी २० जानेवारीला प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. सर्व  जागा मनसे लढवणार असल्याने किती जागा पदरात पडतात आणि सत्ता काबीज करणार का, याचीच चर्चा आहे.

मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये आपली नेमकी किती ताकद आहे, हे अजमावून पाहण्यासाठीच मनसेने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,   कॉंग्रेस  आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि दुसरीकडे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन महायुती यांच्या लढतीमध्ये काही प्रभागांत आपला उमेदवार पक्षाची ताकद नसतानाही निवडून येण्याची शक्‍यता मनसेच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे मोजक्‍याच जागा लढवण्याऐवजी सर्व जागांवर उमेदवार उभे करावेत, अशा निष्कर्षावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आले असल्याचे कळते.

मतांचे विभाजन होण्याचा फायदा कुठेही होणे शक्‍य आहे. त्यामुळे सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे एका मनसे नेत्याने सांगितले. मनसेने सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचे ठरवतानाच केवळ परीक्षा देणाऱ्यांनाच उमेदवारी, ही अट मात्र काढून टाकण्याचे ठरविल्याचे दिसत आहे. एखादा इच्छुक परीक्षेत उत्तीर्ण झाला असेल; पण त्याची निवडून येण्याची क्षमताच नसेल, तर काय उपयोग, असा सवाल मनसेचे नेतेच करीत आहेत.

दरम्यान,  ठाण्यामध्ये मात्र मनसे १०० हून कमी उमेदवार उभे करेल, असे समजते. तेथील काही प्रभागांतून आपला उमेदवार निवडून येण्याची शक्‍यता नसेल आणि चांगले उमेदवारच मिळत नसतील, तर उगाच सर्व जागा लढवण्याचा हट्ट धरणे मनसेला उचित वाटत नाही, असे सांगण्यात सुत्रांकडून सांगण्यात आले.