Karishma Khanna Made Idli in Coconut Shell: इडली हा दक्षिणात्य भागातील खाद्यपदार्थ असून भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात बनवून अगदी आवडीने खाल्ला जातो. आरोग्यासाठीसुद्धा इडली ही फायदेशीर मानली जाते. चविष्ट तसेच आरोग्यदायी असल्यामुळे तज्ज्ञ सुद्धा इडलीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. अगदी स्ट्रीटपासून ते महागड्या रेस्टॉरंट्समध्ये इडली सहज मिळते. परंतु, घरात बनवलेल्या इडलीचे आरोग्यासाठी अधिक फायदे आहेत. त्यामुळे लोक घरीच इडली बनवून खाणं पसंत करतात.
साधारणपणे इडली ही स्टीलच्या किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात शिजवली जाते. परंतु, इडली शिजवण्यासाठी नारळाच्या करवंटीचा वापर केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? आज आम्ही तुम्हाला इडली बनवण्याच्या एका वेगळ्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत. प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना हीने इडली बनवण्यासाठी नारळाच्या करवंटीचा अनोख्या पद्धतीने वापर केल्याचं समोर आलं आहे.
करिश्मा तन्ना नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नारळाच्या करवंटीच्या सहाय्याने तिने इडली शिजवल्याचं दिसत आहे. खरंतर, केरळ या राज्यात नारळाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्या राज्यातील भागात खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात नारळाचा वापर केला जातो. मुंबई सारख्या शहरामध्ये नारळाचा मर्यादित वापर केला जातो. अशातच, करिश्माने नारळाच्या करवंटीमध्ये इडली शिजवण्याचा एक वेगळा प्रयत्न केला असून तो व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. करिश्मा सगळ्यात आधी नारळाच्या करवंटीला तेल लावले त्यात इडलीचे पीठ टाकून ते शिजवून घेतले. नेटकरी सुद्धा तिच्या या अनोख्या प्रयत्नाला पसंती दर्शवत आहेत.
आहारतज्ज्ञांनी सुद्धा नारळाच्या करवंटीचे आरोग्यासाठी बरेच फायदे असल्याचं सांगितलं आहे. अनेकदा आपण नारळाची करवंटी ही कचरा समजून फेकून देतो. मात्र, नारळाच्या करवंटीमध्ये एखादा पदार्थ बनवून खाल्ल्याने त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे मिळतात. आयुर्वेदात सुद्धा नारळाच्या करवंटीचे आरोग्यासाठीचे फायदे नमूद केले आहेत.
नारळाच्या करवंटीमध्ये इडली शिजवल्याने त्याचा वेगळाच फ्लेवर येतो. ज्यामुळे लोक इडलीच्या स्वादाचा आणि फ्लेवरचा आनंद घेत इडली खाऊ शकतात.
नारळाची करवंटी ही मजबूत असते. त्यामध्ये इडली शिजवल्याने बाष्प योग्यरित्या सगळीकडे पसरते जेणेकरुन इडली मऊ होऊन ती सगळीकडून फुलते.
नारळाच्या करवंटीमध्ये फिनोलिक आणि टॅनिन सारखे घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी मदतशीर असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते.
नारळाच्या करवंटीला वाटीच्या आकारात व्यवस्थित कापून घ्या. ते स्वच्छ करा आणि त्याच्या आतील भाग सॅन्ड पेपरने घासून गुळगुळीत करा. हे करताना नारळाच्या करवंटीला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. नारळाच्या करवंटीच्या वापरापूर्वी ती गरम पाण्याने स्वच्छ धुवा.