नाशिक : (मुकूल कुलकर्णी, झी मीडिया) जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणात चौकशीचा केवळ फार्स सुरू आहे. कारवाईतल्या दिरंगाईमुळे महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याची भीती सादरे कुटुंबीयांनी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे प्रकरणातले पुरावे सादर करणं आव्हानात्मक असल्याचं अधिकारी खासगीत बोलतायत.
संपूर्ण पोलीस दलालाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला जळगावचे पोलीस निरिक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येनं हादरवून सोडलं. मात्र या घटनेला दहा बारा दिवस उलटून गेल्यावरही चौकशी सुरू आहे या एका वाक्याशिवाय काहीही ठोस हाती लागलेलं नाही.
कारवाईतली दिरंगाई पुरावे नष्ट करण्यासाठी केली जातेय का अशी शंका सादरे यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलीय.
मात्र पुरावे सादर करण्यासाठी कागदपत्रांचा अभ्यास करावा लागत असल्याचं सांगत पोलीस दिरंगाईचं समर्थन करत आहेत. संशयित अधिका-यांची विभागीय चौकशी सुरू असून अधिक चौकशीसाठी पोलीस पथक जळगावला रवाना झाल्याचा दावाही करण्यात येतोय. मात्र या प्रकरणाचे पुरावे सादर करणं आव्हानात्मक असल्याचं पोलीस खासगीत बोलत आहेत..
पोलीस दलातल्या भ्रष्टाचार आणि हप्तेखोरीला चव्हाट्यावर आणणा-या या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिका-याकडे देण्यात आलीय. मात्र तपासात काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे तिघेही संशयित अजून मोकाट आहेत. त्यांच्यावर काय आणि कधी कारवाई होणार याकडे पोलीस दलाचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.