मराठी माणसाला पेटवू नका

बाळा नांदगावकर परप्रांतवादाचे राजकारण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले नाही. मुळात हा मुद्दा कोणी उकरून काढला हे आपण पाहिले पाहिजे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांना आताच काय गरज होती बोलायची

Updated: Dec 24, 2011, 11:18 AM IST

बाळा नांदगावकर

आमदार, मनसे

 

परप्रांतवादाचे राजकारण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले नाही. मुळात हा मुद्दा कोणी उकरून काढला हे आपण पाहिले पाहिजे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांना आताच काय गरज होती बोलायची की, उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई बंद करून टाकू. आता यांनी नाही केले का चिथावणीखोर आणि भडकाऊ वक्तव्य. संजय निरूपम यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मी तेव्हाच सांगितले होते, की संजय निरूपम यांनी सवंग प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला आहे. त्यांना त्यांच्या पक्षात कोणी कुत्र विचारत नाही. पक्षातील आपल स्थान निर्माण करण्यासाठी ही खेळी संजय निरूपम यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही प्रांतवादाचे राजकारण करीत नाही, निरूपम यांनी या वादाला तोंड फोडलं आहे.

 

संजय निरूपम यांनी चिथावणीखोर वक्तव्य करायची, भडकाऊ भाषण करायची. त्याबद्दल काँग्रेस पक्षातील कोणताही नेता त्यांना काही बोलत नाही. मात्र, या अरेरावीवर आणि मुजोरपणावर राजसाहेबांनी काही बोलले तर मग त्यावेळी सर्वजण उठतात आणि राज साहेबांनी भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषण केल्याची बोंब ठोकतात. आता कुठे गेले काँग्रेसचे मुख्यमंत्री?  त्यांना निरूपमांना गप्प करता येत नाही का.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छटपूजेला विरोध नाही. उत्तर भारतीयांनी आपली छटपूजा साजरी करावी ना! पण छटपूजेच्या नावाखाली सर्व उत्तर भारतीयांनी एकत्र यायचं, आणि आपलं शक्ती प्रदर्शन करायचं हे आम्ही खपवून घेणार नाही. छटपूजेच्या नावाने राजकारण करीत असतील, आपले मतदारसंघ मजबूत करीत असतील तर हा डाव आम्ही हाणून पाडू.

 

उत्तर भारतीयांनी यावे, मुकाट्याने आपला व्यवसाय करावा. पण मुजोरी आणि मग्रुरी दाखवू नये. आम्ही तुमचे स्वागत केले, मात्र, तुम्ही टांग वर करून घाण करणार असाल तर आम्ही ते चालू देणार नाही.

राजसाहेबांनी म्हटले की अशा प्रकारची वक्तव्ये आली आणि मराठी माणूस पेटून उठला तर महाराष्ट्रात दंगली होती. बरोबरच आहे ना! मराठी माणसाला वेळोवेळी डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. मराठी माणूस पेटून उठला तर दंगलीच होतील हे पण तितकचं खरं आहे.

 

संजय निरूपम हे मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत. तेव्हा त्यांना मला एक प्रश्न या ठिकाणी विचाराचा आहे. त्यांनी अशी भाषा करण्यापूर्वी उत्तर भारतीयांना विचारले का, की तुम्हांला मुंबई बंद करायची का रे बाबांनो! तसेच त्यांनी काँग्रेसमधील मराठी नेत्यांना मुंबई बंद करण्याबद्दल विचारले असते तर त्यांनी निरूपम यांना जोड्याने मारले असते.

 

माझं म्हणणं असं आहे की, त्यांनी एकदा मुंबई बंद करूनच दाखवावी. त्यांच्या हिम्मत असेल ना तर हे होऊनच जाऊ दे. मग मराठी माणूस काय करेल हे तुम्ही पाहूनच घ्या.

 

जय जय महाराष्ट्र...’ वर थिरकले कृपाशंकर

मनसेचे नेते कृपाशंकर सिंहाबरोबर होळीमध्ये नाचले, हा दाखला नेहमी दिली जातो. या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की मनसचे पदाधिकारी वाघी सारस्वत यांनी होळीसाठी मला आणि शिशिर शिंदे यांना आमंत्रण दिले होते. मी जाऊ शकलो नाही, शिंदे गेले आणि त्याठिकाणी कृपाशंकर सिंहदेखील आले. त्यावेळी जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे लागले होते. त्या गाण्यावर कृपाशंकर सिंह यांना आम्ही नाचवलं